केंद्र सरकार त्यासाठी १५० कोटी रु. देणार : माजी आमदार प्रशांत परिचारक
पंढरपूर : ईगल आय न्यूज
वाखरी ( ता. पंढरपूर ) ते श्री विठ्ठल मंदिर या दरम्यानचा साडे आठ किमी लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असून यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
यावेळी अधिक माहिती देताना परिचारक म्हणाले कि, वाखरी बायपास ते पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा साडे आठ किमी लांबीचा मार्ग सिमेंट काँक्रीटचा करण्यात येत आहे. बायपास ते एम आय टी हा रस्ता दोन पदरी, एम आय टी ते पंढरपूर अर्बन बँक रस्ता चौपदरी, अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकरस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. शिवाय वाखरी ओढ्यावर मोठा पूल, वाखरी जवळ काळे ओढ्यावर एक पूल आणि इसबावी येथील मलपे ओढा येथे दूध डेअरी पासून एक पूल मंजूर आहे.
या मार्गासाठी भूसंपादन नाही
वाखरी एम आय टी पासून पंढरपूर अर्बन बँकेपर्यंत सध्या हा रस्ता मुळातच चौपदरी रुंदीचा आहे. त्यामुळे या मार्गावर कुठेही भूसंपादन करावे लागणार नाही. अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत सध्या असलेल्या रस्त्यानुसारच दोन पदरी काँक्रीट रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी सुद्धा भूसंपादन करण्याची गरज नाही. पुढील ५० वर्षांचा या प्रमुख रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचेही परिचारक यांनी सांगितले.
शिवाय रेल्वे रुळावरून साडेचारशे मीटर्स लांबीचा ओव्हरब्रीज आहे.या मार्गाच्या दोन्ही बाजूनी पेव्हर ब्लॉक, दोन्ही बाजूने गटार , पावसाच्या पाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे असणार आहेत. शिवाय इसबावी ४ मीटर्स रुंदीचा अंडरपास रस्ता आहे. वाखरी येथे दोन्ही बाजूनी सर्व्हिस रस्ता आहे, या मार्गावर भाविकांसाठी ४ ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे. अशीही माहिती परिचारक यांनी दिली.