ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नवीन कारभाऱ्यांचीही अतिक्रमणास मूक संमती ?
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी ( ता.पंढरपूर ) गावात दररोज सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर कुठे ना कुठे अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण होत असल्याचे दिसत असूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कसलीही कारवाई केली जात नाही. अतिक्रमण करणाऱ्यांना अटकाव घातला जात नाही. त्यामुळे वाखरी गावाला बकालपण यायला लागले असून लाखो रुपये किमतीच्या जागा बळकावला जात आहेत.
वाखरी हे गाव पंढरपूर शहरालगत आहे, त्यामुळे गावातील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. गावठाण आणि पंढरपूर शहराच्या हद्दीलगत असलेल्या भागांत सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, स्मशानभूमीसाठीच्या खुल्या जागेत, गावातील रस्त्याच्या बाजूला आणि अनेक ठिकाणी चक्क रस्त्यावरच अतिक्रमण केले जात आहे.
अनेक लोकांनी राजकीय वरदहस्त घेऊन राहण्यासाठी जागा बळकावल्या आहेत, पत्रा शेड आणि पक्की बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे या अतिक्रमनास पायबंद घालण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी नेहमीच कानाडोळा केला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या सग्या, संबंधातील लोकांना अतिक्रमण करण्यासाठी प्रेरित केले आहे असे दिसून येते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावात अतिक्रमण वाढीस लागले आहे. मात्र एकही अतिक्रमण हटवण्याची तत्परता दाखवण्यात आलेली नाही.
याच बेबंदशाहीचा लाभ उठवत गेल्या काही महिन्यापासून लोकांनी चक्क काँक्रीटच्या रस्त्यावरही अतिक्रमणे करून रस्ते अरुंद केले आहेत. यामुळे गावाला बकालपणा आलेला आहे, शिवाय लाखो रुपये किमतीच्या जागा बळकावल्या जात आहेत.
नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली, यानंतर सत्तेत आलेल्या आणि विरोधात असलेल्या दोन्ही आघाडीच्या सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे. नवीन कारभाऱ्यांनीही बोटचेपी भूमिका घेतली आहे, त्यामुळे गावात पुन्हा नव्याने अतिक्रमणे वाढू लागली आहेत. ही अतिक्रमणे काढली जावीत अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.