40 वारकऱ्यांसह पंढरपूरपर्यंत पायी जाऊ द्या : वारकऱ्यांचा आग्रह

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आषाढीच्या सोहळ्यासाठी सर्व मानाच्या संतांच्या पालख्या सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत वाखरी पालखी तळावर दाखल झाल्या. त्यावेळी संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी चाळीस वारकर्‍यांसह विसावा नव्हे तर पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचा आग्रह धरला. याबाबत वारकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची काही काळ चर्चाही झाली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.

आषाढीसाठी सर्व मनाच्या संतांच्या पालख्या वाखरी येथे विसावल्या. यानंतर संताच्या पादुकांसह या पालख्या विसावा मंदिरापर्यंत पायी जाण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. विसावा मंदिरापासून केवळ प्रातिनिधिक दोनच वारकरी पंढरपूर पर्यंत चालत जातील. असेही शासकीय आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र वाखरी येथे आल्यावर वारकऱ्यांनी शासन आदेशाला न जुमानता पंढरपूर पर्यंत प्रत्येक संताच्या पादुकासमवेतचे 40 वारकरी चालत जातील. असा आग्रह धरला.

याबाबत संत तुकाराम महाराज संस्थानने पादुका एसटी बस मधून वाखरी तळावर घेण्यापूर्वीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांना चालत जाण्याची मागणी केली. याबाबत प्रशासनाशी वारकऱ्यांची चर्चाही घडली. देहू संस्थांच्या पायी जाण्याच्या भूमिकेस इतर मानाच्या संस्थानच्या विश्वस्तांनी अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दर्शवला आहे.

त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सर्व वारकर्यांना संतांच्या पादुकांसह विसावा मंदिराच्याही पुढे पंढरपूर पर्यंत चालत जाण्याची मुभा देणार का ? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!