माऊलींच्या सोहळ्यातील मानाची वासकर दिंडी पंढरीत पोहोचली

7 दिवसात पूर्ण : 230 किमी चा पायी प्रवास

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनाचे महासंकट , पोलिस प्रशासनाची रस्त्यावर होणारी अडवणूक या सर्व गोष्टींचा गनिमी काव्याने सामना करीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची गुरुवर्य तात्यासाहेब वासकर दिंडी आज भूवैकुंठ पंढरीत दाखल झाली . आणि दिंडीने आपली पायी वारीची परंपरा कायम ठेवली. विशेष म्हणजे अवघ्या 7 दिवसात ही दिंडी पंढरीत दाखल झाली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पायी वारीला परवानगी नाकारली आहे . त्यामुळे संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम महाराजांसह मानाचे दहा पालखी सोहळे गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला येत आहेत. शासनाने विवाह , निवडणुका , मेळावे , सभा , समारंभाप्रमाणे पायी वारीलाही परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती .

वारकरी प्रतिनिधी व जेष्ठ कीर्तनकार ह भ प बंडातात्या कराडकर व पांडुरंग महाराज घुले यांनी याबाबत आग्रह धरला होता व आपल्या निवडक वारकऱ्यांसह त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानानंतर चालायला सुरुवातही केली, परंतु दिघीजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व कराड येथे पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले. पोलिसांना हुलकावणी देत दादा महाराज शिरवळकर दिंडी आळंदीहून निघाली परंतु दिवे घाटात त्या दिंडीला पोलिसांनी अडविले व अटक केली.

हातामध्ये टाळ आणि खांद्यावर वीणा घेवून ” रामकृष्ण हरी ” नामाचा जयघोष करीत भूवैकुंठ असलेल्या पंढरीत दाखल झाले. आळंदी ते पंढरपूर हे अंतर त्यांनी केवळ सात दिवसात पूर्ण केले . संचारबंदी पुर्वीच पंढरीत येवून त्यांनी चंद्रभागेचे स्नान केले , नामदेव पायरीचे व कळसाचे दर्शन घेवून नगरप्रदक्षिणा पुर्ण केली.

दिंड्यांचे अटकसत्र सुरु असतानाच माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची दिंडी म्हणून ओळख असलेल्या तात्यासाहेब वासकर दिंडीने मात्र पोलिसांना गुंगारा देत वारकरी सांप्रदायाची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत मजल दरमजल करीत पायी वारी पूर्ण केली.

धन्य झालो जगी , पावलो पंढरी l

कोरोनाच्या काळात गतवर्षी व यंदाही पायी वारी नसल्याने मनात खंत वाटत होती. पंढरीची वारी हा आमचा कुळधर्म परंतु शासनाने पायी वारीला बंदी घातल्याने यंदा तरी चंद्रभागेचे स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन, नगरप्रदक्षिणा होते की नाही याची चिंता वाटत होती. तात्यासाहेब वासकरफडाने पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला आणि वीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, मी धन्य झालो. आळंदी ते पंढरपूर पायी वाटचाल करताना ” आता या पायी वारीतच मोक्ष मिळावा ” ही भावना माझ्या मनात निर्माण झाली. पंढरीच्या परमात्म्याने ही पायी वारी पुर्ण करुन घेतली मी धन्य झालो, त्याचा मला आनंद वाटतो. अशी भावना दिंडीच्या विणेकरी भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

error: Content is protected !!