पंढरपूर तालुक्यात भीमा दुथडी : सर्व बंधारे पाण्याखाली
पंढरपूर : ईगल आय न्यूज
उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी रविवारी सकाळपासून पंढरपूर येथे पोहोचले आहे. येथील चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी सकाळपासून वाढू लागली आणि दुपारपर्यंत वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा विळखा पडला होता. तर तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.रविवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणातून ६१ हजार ६०० क्यू. तर साडे सात वाजता वीर धरणातून ६३ हजार २७३ क्यू इतका विसर्ग करण्यात आला होता. दौंड येथे उजनी धरणात येणारा विसर्ग ५८ हजार ५८६ क्यू इतका आहे, त्यामुळे पुढील दोन दिवसात उजनितील विसर्ग कायम राहील आणि भीमा नदीची पाणी पातळी वाढत राहणार आहे.
सायंकाळी सहा वाजता येथील चंद्रभागा नदीतील विसर्ग ५२ हजार क्यू इतका होता. तर संगम ( ता. माळशिरस ) येथील भीमा नदीचा विसर्ग ९२ हजार क्यू इतका होता. त्यामुळे सोमवारी पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीची पाणी पातळी वाढती राहणार आहे. नागरिकांनी नदी पात्राकडे जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व धरणावर सुरू असलेल्या पावसामुळे उज्जनी आणि वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे उजनी आणि वीर धरणातून शनिवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील येणारा पाण्याचा विसर्ग कायम असल्याने रविवारी चंद्र भाग नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर जुना दगडी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
हा पूल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तालुका पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला. दुपारपासून दगडी पुलावरून पानी वाहू लागले होते तर वाळवंटातील सर्व मंदिरे सायंकाळी सह वाजेपर्यंत पाण्याने आपल्या कवेत घेतली होती.