खरसोळी येथे राजाभाऊ खरे यांचा लोकप्रतिनिधींना सवाल : ४८ लाख रूये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
पंढरपूर : प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावोगावी आजही बहुतांश रस्त्यांची दुर्दशा झालेली पहावयास मिळते. अनेक भागात लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत. असे असताना विद्यमान लोकप्रतिनिधी २७०० कोटी रूपयांचा निधी आणल्याचा डांगोरा पिटत आहेत. मग हा निधी गेला कुठे ? असा सवाल करीत अनगरपुरता विकास करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा उद्योजक राजाभाऊ खरे यांनी केले.
खरसोळी गावातील ४ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी खरे यांनी ४८ लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास सौदागर गायकवाड, छगन पवार, अशोक भोसले, शरद पवार, महावीर जाधव, नेपतगांवचे सरपंच पांडुरंग परकाळे, अरूण बनसोडे, नानासाहेब व्हनकळस, लखन घाटे, आकाश पवार, अमर पवार, हणमंत शिंदे, बालाजी वाघ, दादा आसबे, उमेश पवार, शंकर पवार, मच्छिंद्ग लेंडवे, बंडू कांबळे, जितू ओव्हाळ, कैलास ओव्हाळ आदींसह विविध गांवचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुुढे बोलताना खरे म्हणाले, माझ्याकडे कोणतेही पद नाही. कारखाना अथवा माझी सूतगिरणी नाही. तरीही काम करणारा तळमळीचा, प्रामाणिक माणूस म्हणून मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री, नेत्यांनी मागेल तेवढा निधी मला माझ्या जनतेसाठी दिला. आज खरसोळीत ४८ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ करीत आहोत. स्वखर्चाने अनेक ठिकाणची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे नेमकं कामाचं कोण आणि कोटींच्या कोरड्या गप्पा मारणारं कोण आहे ? हे लोकांना कळून चुकलं आहे.
आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी अनगरच्या नेत्यांनी गेल्या तीन निवडणुकीत गेटकेन उमेदवार लादले. सगळा निधी तसेच महत्वाची शासकीय कार्यालयेही अनगरला नेली. मतदारसंघातील महिला सुद्धा सुरक्षित राहिलेल्या नाहीत. दादागिरी, तानाशाही करीत उर्वरित मतदारसंघातील जनतेला वेठीस धरण्याचे पाप त्यांनी केले आहे. जनता आता २०२४ च्या निवडणुकीची वाट पाहत असून विकास आणि पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित ठेवणाऱ्यांना येत्या निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असेही खरे म्हणाले.
गट-गट बाजुला ठेवापंढरपूर तालुका चार मतदारसंघात विभागाला असून एकही भूमिपुत्र आमदार आज सभागृहात नाही. दादागिरी, तानाशाहीला कंटाळलेल्या मोहोळ आणि उत्तर सोलापूरच्या जनतेने परिवर्तन करण्याचे ठरविले आहे. आपल्या १७ गावांनी गट-तट बाजुला ठेऊन येत्या निवडणुकीत एकमुखाने साथ द्यावी. विकास कामांतून संपूर्ण मतदारसंघाचे चित्र बदलून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही खरे यांनी दिला.
पंढरपूर तालुक्याचा सुपूत्र म्हणून मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी १७ गावांची आहे. मी या भागात मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, आरोग्य सुविधा, शाळांसाठी मदत केली. कोणताही गट तट, जात-पात पहिली नाही. काम करणारा आपला माणूस म्हणून सर्वांनी आशीर्वाद द्या. असे आवाहन खरे यांनी केले.