पुण्यातील घरी जाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला सन्मान
पुणे : ईगल आय मीडिया
दोन दिवसांपूर्वी पोटासाठी पुण्यातील रस्त्यावर लाठी-काठीच्या कसरत दाखवणाऱ्या आजींचा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला. याच आजीबाईंना मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात अजीबाईंच्या घरी जाऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 1 लाख रुपये रोख आणि साडी चोळीची सन्मानपूर्वक भेट दिली.
पुणे येथील 84 वर्षाच्या आजीबाई शांताबाई पवार यांचा रस्त्याकडेला लाठी- काठी ची कसरत करीत असलेला व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला. त्याची दखल मुख्य माध्यमांनीही घेतली. सिने अभिनेता रितेश देशमुख याने या आजीला ‘वॉरीयर आज्जी’ असे विशेषण लावून त्यांचा पत्ता नेटकऱ्यांकडून माहीत करून घेतला. त्याचबरोबर अभिनेता सोनू सूद यांनेही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
पुणे येथील वॉरिअर आजी ‘शांताबाई पवार’ यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आणि पक्षातर्फे त्यांना साडी चोळी आणि 1 लाख रुपयांची रोख मदत दिली.
या संदर्भात ट्विटरवर ना. देशमुख यांनी माहिती दिली असून ते म्हणतात की, अनेकांकडून मला ८५ वर्षांच्या शांता आजींची जगण्याची कसरत समजली. त्यांना भेटून मला एक नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली. मी पक्षातर्फे एक लाख रुपये व नऊवारी साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान केला.
लॉकडाऊनच्या काळात पुणे पोलिसांच्या भरोसा सेलने १५ हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करून मानवसेवेचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. येत्या काळात भरोसा सेलला त्यांच्या कामामुळे मदतीचा ओघ सुरूच राहील याचा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
84 वर्षाच्या वृद्धा शांताबाई पवार यांचा व्हीडिओ समाजातील नैराश्याने ग्रस्त होऊन आत्महत्येचा विचार करणाऱ्या करणाऱ्या लाखो लोकांना जगण्याची आणि संघर्षाची प्रेरणा देणारा आहे असे मानले जात आहे.