बोनेटवर बसून नवरी निघाली लग्नाला

लोणी काळभोर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

दिवे घाटातून थाटात निघालेली नवरी

टीम : ईगल आय मीडिया

स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर बसून लग्नासाठी निघालेल्या नवरी विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सासवड येथे दिवे घाटातून लग्नासाठी ही नवरी निघाली होती. मोटार वाहन अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि कोविड रेग्युलेशन कायद्या अंतर्गत विविध कलमानुसार या नवरीसह व्हीडिओ चित्रकार, गाडीचा चालक आणि इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवार (दि.13 जुलै ) रोजी फिरत्या एसयूव्ही (स्कॉर्पिओ) च्या बोनेटवर बसलेल्या आणि आपल्या विवाहसोहळ्यासाठी एक 23 वर्षीय नवरी निघाली होती. सजून-धजून निघालेल्या नवरीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया, व्हायरल झाला आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिसांनी नवरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाडी सासवडकडे जात होती, जिथे विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता, मंगळवारी सकाळी घाटात हा व्हिडिओ शूट करण्यात आला. ती महिला चालत्या वाहनाच्या बोनटवर असताना मोटारसायकलवरील एक व्यक्ती व्हिडिओ शूट करत होती.


आम्ही मोटार वाहन कायद्यातील तरतुदी आणि आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र कोविड रेग्युलेशन अ‍ॅक्ट इत्यादी कलमांनुसार वाहन, चालकासह महिला, व्हिडिओग्राफर आणि वाहनावरील इतर लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी कोणीही मास्क घातलेले नव्हते, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!