पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरसाळे ( ता. पंढरपूर ) येथील भोमा नदीवर आज दुपारी स्नानास आलेला एक तरुण वाहून गेला आणि त्याचा थांगपत्ता न लागल्याने नदी परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम राबवली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 च्या बायपास मार्गाचे काम सुरू असून भीमा नदीवर पुलाचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावर काम करीत असलेला हुसेन रझा हा युवक गुरसाळे बंधाऱ्यावर स्नानासाठी आला होता. यावेळी त्या तरुणासोबत अन्य काही मित्रही स्नानासाठी आले होते अशी माहिती मिळाली आहे, त्याआधी त्यांनी सेल्फीही घेतली होती.
सध्या वीर धरणातून नीरा नदीला सोडलेले पाणी भीमा नदीला येत आहे, त्यामुळे नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागासह तालुका महसूल विभाग आणि पोलिसांनी ही केले आहे.तरीही पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारीच नदीवर गेल्याचे आणि हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.