सोलापूर : ईगल आय मीडिया
शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय बांधकाम शुभारंभ करणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय देखभाल व दुरुस्ती करणे, शौचालय व परिसर स्वच्छता करणे अशा विविध अभिनव उपक्रमांनी दि 19 नोव्हेंबर 2021 हा दिवस जागतिक शौचालय दिन साजरा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या आहेत.
ग्रामीण भागात शाश्वत स्वछता टिकून राहावी, नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा, वैयक्तिक आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ राहावा म्हणून दर वर्षी 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी देखील महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दिनांक 17 नोव्हेंबर ते दिनांक 23 नोव्हेंबर 2021 या कालावधी मध्ये स्वच्छतेचे विविध उपक्रम ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ५ डिसेंबर पर्यंत ४० हजार शौषखड्डे पुर्ण करायवायचे आहेत. याबाबत सार्वजनिक शौषखड्डे सुरू करा. प्रत्येक लाभार्थ्यांची नोंद केंद्र शासनाचे संकेतस्थळावर करायवायची आहे. शौषखड्डे घेतलेले लाभार्थ्यांची नावे पाठवा. जिल्ह्यातील बहुतांश शाळा आणि अंगणवाडी मध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित स्वच्छतेची कामे अभियान कालावधीत पुर्ण करा अशा सुचना दिल्या.
तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल प्रकल्प विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह गावातील सरपंच, ग्रामसेवक, आशाताई, अंगणवाडीताई आणि नागरिकांनी सहभाग नोंदवून जागतिक शौचालय दिन बरोबर इतर विविध स्वच्छतेचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मीता पाटील यांनी केले आहे.