पंढरपूर : ईगल आय मीडिया
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आघाडीचे घटक म्हणून विधान परिषदेत जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे एकेकाळचे शिष्य माजी मंत्री आमदार सदाशिव खोत हेसुद्धा विधानपरिषदेत असणार आहेत. मागील ३ वर्षात राजकारणाच्या मैदानात दोघांमध्ये मोठा संघर्ष झाला असून आता शेट्टी आणि खोत हे गुरु शिष्य विधानपरिषदेत परस्पर विरोधात उभा ठाकणार आहेत.
राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, शरद जोशी यांच्या मुशीत तयार झालेल्या राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळ प्रत्यक्षात शरद जोशी यांच्यापेक्षा अधिक व्यापक केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा झुंजार नेता म्हणून त्यांची देशपातळीवर ओळख झाली. अशा शेट्टी यांनी जीवावर उदार होऊन शेतकरी चळवळ वाढवली, चालवली. चळवळीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातही साखर आणि सहकार सम्राटांना आव्हान दिले. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष संघटनेत स्वाभिमानाला स्थान मिळवून दिले. त्यांच्या या प्रवासात सदाभाऊ खोत यांनीही नेटाने साथ दिली. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाची साखर सम्राटांना भीती वाटू लागली होती. शेतकऱ्यांची फाटकी -तुटकी पोरं आंदोलनाने पेटून उठली आणि साखर कारखानदार, सहकार सम्राट याना जेरीस आणले. शेतकरी संघटनेच्या संघर्षामुळेच २०१४ साली राज्यात सत्ता परिवर्तन झाले.
स्वाभिमानीच्या मदतीने सत्तेत आलेल्या भाजपने नंतर पद्धतशीरपणे सदाशिव खोत याना शेट्टी यांच्यापासून बाजूला केले. सदाभाऊंनी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना दिलेला शब्द फिरवला आणि सत्तेच्या मोहाने संघटना सोडली. नुसतीच सोडली नाही तर स्वाभिमानी फोडली. त्यानंतर सांगली जिल्हा परिषद निवडणूक, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतही शेट्टी आणि खोत यांच्यात संघर्ष होत राहिला. हा संघर्ष आजही कायम आहे. एकेकाळी एकमेकांची सावली असलेले हे दोन्ही शेतकरी नेते आता एकमेकांचे राजकीय शत्रू बनलेले आहेत. सदाशिव खोत हे भाजपचे सदस्य म्हणून विधानपरिषदेत आहेत तर राजू शेट्टी आताचे शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे घटक म्हणून विधानपरिषदेत जात आहेत. हे दोन्हीही शिष्य सभागृहात एकमेकांच्या विरोधात उभा ठाकल्यानंतर संघर्ष आणखी टोकाला जाणार कि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा सहमतीने जाणार हे येणारा काळ सांगेल. राजू शेट्टी प्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षालाही शिंगावर घेतील मात्र त्यावेळी सदाशिव खोत यांची भूमिका काय असेल असा प्रश्न उभा राहतो आहे. सध्या तरी राज्यातील संघटनेचे कार्यकर्ते , शेतकरी यांच्यात हे दोघे गुरु शिष्य आमने -सामने आल्यावर काय होईल याची उत्सुकता लागली आहे.