मे 2019 साली लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर जर कोणी म्हणाले असते की , राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उठून उभा राहील, सत्तेच्या आकाशात उंच झेप घेईल तर त्याला वेड्यात काढलं असतं. मात्र आज, 2020 साली हा पक्ष आपल्या स्थापनेचा 21 वा वर्धापन दिन साजरा करीत असताना नव्या दमाने, नव्या विश्वासाने उभा राहिल्याचे दिसून येते. 21 वर्षे वयाच्या उमद्या तरुणांच्या मनात जी उमेद असते, त्याच्या मनगटात जी रग असते, त्याच्या नजरेत जी आग असते ती आणि तीच आज 21 वर्षाच्या राष्ट्रवादी मध्ये दिसून येते.
1999 साली सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलून 10 जून रोजी मुंबईत या पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी पक्षाच्या निर्मितीमध्ये सोबत असलेले पी ए संगमा, डी पी त्रिपाठी आज हयात नाहीत आणि दुसरे संस्थापक तारिक अनवर आज काँग्रेस मुक्कामी पोहोचले आहेत.या पक्षाच्या 21 वर्षाच्या वाटचालीत गल्ली ते दिल्ली अनेक लहान,मोठे नेते,कार्यकर्ते पक्षासोबत आले, बरेचसे थांबले, रमले आणि काहीजण निघून गेले. शरद पवारांमुळे पक्षाकडे सत्ता पहिल्या दिवसापासून आली, तब्बल 15 वर्षे अखंडित राहिली. मात्र 15 वर्षानंतर 2014 साली ती गेली. त्यानंतरची 5 वर्षे पक्षाची वाटचाल अतिशय खडतर होती. 2014 साली काँग्रेस सारख्या सव्वाशे वर्षे वयाच्या, तळागाळात रुजलेल्या पक्षाला घरघर लागली, अनेक प्रादेशिक पक्ष अस्तित्वाचा संघर्ष करीत होते. त्याच गर्दीत राष्ट्रवादी काँग्रेस ही गटांगळ्या खात होता.
जन्मताच सत्तेचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या या पक्षातील अनेक जीव, मग सत्तेअभावी तडफडू लागले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा सत्तेत येऊ या अपेक्षेने थांबलेले काही सत्ताभिलाषी जीव लोकसभेच्या निकालानंतर फडफड उडाले आणि सत्तेच्या खत पाण्यामुळे बहरलेल्या भाजप या महाकाय वृक्षावर जाऊन विसावले. काही शिवसेनेच्या फांदीवर जाऊन बसले.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अवघे 4 खासदार जिंकता आले. विधानसभेला 25 जागा तरी येतात की नाही कुणास ठाऊक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रोजचा दिवस उजाडला की कोणी तरी पक्ष सोडल्याच्या आणि दिवस मावळत असताना आणखी कोणी तरी बाहेर पडल्याच्या बातम्या यायच्या. या पडझडीमुळे पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीनंतर संपून जाईल, पवारांचे राजकारण संपले, आता माझे सुरू झाले अशा वलग्ना केल्या जाऊ लागल्या. घरातील पद्मसिंह पाटील, जिवाभावाचे मधुकर पिचड, युवक नेते रणजितसिंह मोहिते पाटील, साताऱ्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, नवी मुंबईचे मालक गणेश नाईक, धनंजय महाडिक, अशा अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी च लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांनी भाजपला जवळ केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. या पक्षाची मास बेस असलेली नेते मंडळी फोडून भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला होता. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले, हा पक्षासाठी खूप मोठा आणि जिव्हारी लागणारा धक्का होता. हे कमी की काय म्हणून राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यात खा शरद पवार यांचे नाव गोवले आणि त्यांना ईडी ने नोटीस पाठवली. तोपर्यंत महाराष्टात शरद् पवार यांनी जे जातील त्यांना जाऊ देण्याची भूमिका घेतली होती. कुणाची मनधरणी केली नाही,कुणाला अडवलं नाही. ज्यांना जायचे ते गेले होते, अनेकजण निघाले होते. पक्ष आता संपला असे वातावरण निर्माण झालेले असताना शस्त्र टाकतील ते शरद पवार कसले ?
वृद्धापकाळावर मात करून वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला. नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर, परभणी, नगर,नांदेड, जळगाव, नागपूर असे फिरून संपूर्ण राज्यात त्यांनी युवकांना साद घातली. पुण्यातील जाहीर सभेत, मी काय म्हातारा झालोय काय, 56 उंची छाती नसेल, मात्र आमच्या मनगटात रग आहे, महाराष्ट्रातून भाजपचे सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार व्यक्त केला. त्यांची ही लढाऊ वृत्ती, भाजपचे सत्तेसाठीचे पिसाटलेपण, दडपशाहीचे, दबावाने राजकारण मराठी मनाला रुचले नाही. 52 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक पराभव , अनेक विजय पाहिलेल्या पवारांनी भाजपचे आव्हान स्वीकारले होते. त्यांच्या जोडीला नव्या दमाचे, स्वच्छ प्रतिमेचे खा अमोल कोल्हे,धनंजय मुंढे, अमोल मिटकरी, रुपालीताई चाकणकर, अनुभवी आणि मुरब्बी छगन भुजबळ, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आदी जिवाभावाचे सहकारी, जीव तोडून लढणारे सोशल मीडियातील असंख्य कार्यकर्ते उभा राहीले.
ज्या राष्ट्रवादी चे 25 आमदार सुद्धा येणार नाहीत, वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्ष असेल अशी समजूत करून घेतलेल्या भाजपला पवारांनी आपलं राजकारण, आपली ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादी ने 54 आमदार निवडून आणलेच, परंतु काँग्रेस आघाडीच्या जागा 100 पर्यंत खेचून आणल्या. आणि पुढे चाणक्य नीतीचा अवलंब करून सेना,भाजपच्या आघाडीला सुरुंग लावून 105 आमदार असलेल्या भाजपला सत्तेतून बाहेर घालवले. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उखडून टाकण्याचे मोदिशा, फडणवीस यांचे स्वप्न तर चक्काचूर झालेच मात्र सत्तेतून पायउतार होण्याची नामुष्की आजही भाजप आणि त्या पक्षाच्या धुरीणानां अजूनही झोप लागू देत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापनेपासून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवलेला एकमेव मराठी पक्ष आहे. गेल्या 20 वर्षात या पक्षाचे देशाच्या अन्य राज्यात सातत्याने आमदार,खासदार निवडून येत आहेत. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी सारख्या पक्षांना आपले अस्तित्व आकसून जाताना पाहावे लागले परंतु राष्ट्रवादीने 21 वा वर्धापनदिन साजरा करीत असतानाही आपले देशपातळीवरील अस्तित्व, महत्व अधोरेखित केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी केवळ सोनियांच्या विरोधात झालेली नाही तर त्यामागे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे दूरदृष्टीचे धोरण होते. राष्ट्रीय विचार, धर्मनिरपेक्ष भूमिका, सर्वसमावेशक नीती अवलंबून हा पक्ष , केवळ भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण करून राज्यात तळागाळात रुजला आहे.
म्हणून तर कितीही संकटे आली तरीही राष्ट्रवादी संपत नाही,
पराभवाच्या राखेत मिसळला तरीही पुन्हा हा पक्ष झेपावतो आहे आणि पुन्हा सत्तेला गवसणी घालतो आहे.
केवळ सत्ता साधना हे या पक्षाचे धोरण नाही, तर सर्व समाज घटकांना सत्तेत सामावून घेणे, सत्तेच्या माध्यमातून सर्व समाज घटकांचा विकास साधने, राज्याची अस्मिता जपत असताना राष्ट्रवादी च्या धोरणांत देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. गेल्या 10 वर्षात उजव्या विचारसरणीच्या it सेलच्या माध्यमातून या पक्षाची प्रतिमा मलिन केली गेली, एका नव्या पिढीच्या मनात शरद पवार आणि राष्ट्रवादी यांच्याविषयी विष कालवण्याचा प्रयत्न झाला. त्याला बऱ्यापैकी यश आलेले असताना, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी एक झंझावात उभा केला, मराठी अस्मितेचा हुंकार ऐकवला, भ्रष्टाचाराच्या बिनबुडाच्या आरोपाना सपशेल खोटे पाडले त्याच बरोबर भाजप सरकार च्या कथनी करणी मधील फरक नव्या पिढीच्या लक्षात आला. त्यामुळेच राज्यात सत्ता परिवर्तन झाले
आज या पक्षाकडे युवक वर्ग मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे , साखर सम्राट, पिढ्यान पिढ्या सत्तेत असलेली घराणी आपसूकच पक्षाबाहेर पडली आहेत. ज्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाला सत्ता मिळाली त्या कार्यकर्त्यांना आता ताकद देण्याची जबाबदारी पक्षाची आहे. उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचे धोरण कागदावर न राहता त्याची अमलबजावणी व्हायला हवी. अमोल मिटकरी यांच्या सारख्या सामान्यास पक्षाने संधी दिली आहे . तसेच अनेक नवे चेहरे नव्या संधीच्या शोधात पक्षाचे काम करीत आहेत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची, समाजोन्नतीची जबाबदारी पक्षाला घ्यावी लागेल तरच नव्या पिढीने खांद्यावर घेतलेला पक्षाचा झेंडा असाच दर निवडणुकीत उंचावत राहील .
हे परिवर्तन 21 वर्षे वयाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांनीं, कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांनी घडवून आणले आहे.
गेल्या वर्षी 20 वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या राष्ट्रवादी पुढे भवितव्याची चिंता होती, 21 वा वर्धापनदिन साजरा करताना या पक्षाला पुढच्या 20 वर्षाची ऊर्जा मिळाली आहे.2004 साली अशाच प्रकारे अस्तित्वाच्या कड्यावर उभा राहिलेला पक्ष पवारांच्या कणखर नेतृत्वामुळे पुन्हा झेपावला होता. आज 2020 साली पराभवाच्या राखेतून हा फिनिक्स पुन्हा झेपावला आहे.
सत्तेच्या बाहेर जाऊन पुन्हा सत्तेत आल्यामुळे यापुढे या पक्षाला सत्ता जाण्याची भीती, अस्तित्वाची अनिश्चितता जाणवणार नाही तर प्रत्येक संकटात हा पक्ष पुन्हा उभा राहील याबाबत नव्या पिढीने विश्वास दिला आहे. म्हणूनच 21 वा वर्धापन दिन राष्ट्रवादी ला अधिक तरुण बनवणारा आहे. सत्ता, राजकारण, समाजकारण या मैदानात मॅरेथॉन वाटचालीस पक्ष सज्ज झाला आहे.
Good
अचूक वर्णन