पंढरपूर : ईगल आय मीडिया
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आता विधानपरिषदेत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवारी बारामती येथील खा शरद पवार यांच्या गोविंद बागेतील निवासस्थानी खा राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा प्रस्ताव मान्य केला आहे. या वृत्तास सतीश काकडे यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी खा सुप्रिया सुळे, राजेंद्र ढवण आदि उपस्थित होते.
राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेत 12 सदस्य निवडले जाणार आहेत, सत्ताधारी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ला प्रत्येकी 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार राष्ट्रवादी च्या कोट्यातून स्वाभिमानी चे अध्यक्ष खा राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेत जावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी ने ठेवला होता. हा प्रस्ताव शेट्टी स्वीकारतात की नाही याकडे लक्ष लागले होते. मंगळवारी शेट्टी यांनी बारामतीत खा पवारांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पवारांनी आपल्या गाडीतून शेट्टी यांना गोविंद बाग आणि परिसरातील त्यांच्या शेतीतील उपक्रम दाखवले.