टीम : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा शरद पवार यांचा कोकण दौरा झाल्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर गेले आहेत. ११ आणि १२ जून या दोन दिवसात ते रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
मागील आठवड्यात येऊन गेलेल्या वादळाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. ९ आणि १० जून रोजी शरद पवार यांनी कोकणात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला आहे. खा पवारांनी पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत द्यावी असे आवाहन केले आहे . त्यांच्या पाठोपाठ आता फडणवीस यांचा दौरा सुरु झाला आहे. रेवदंडा येथे निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन फडणवीस यांनी या दौऱ्याची सुरुवात केली आहे. काशीद, राजापुरी , दिवेआगर आगरदांडा श्रीवर्धन या भागात ते पाहणी करतील. महाराष्ट्र भाजपच्या वतीने अगोदरच कोकणातील बाधित गावांसाठी वस्तू स्वरूपातील मदत पाठवली गेलेली आहे. आता फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर केन्द्र सरकारकडे योग्य त्या नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षाही बळावली आहे.