विकासाचे व्हिजन : अबाल वृद्धांची सभाना तुफान गर्दी
पंढरपूर : प्रतिनिधी
३० वर्षे विधानसभेची संधी दिली, मतदारसंघासाठी निधी दिला, त्यांनी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ऐनवेळी पवार साहेबांची साथ सोडत सत्तेच्या मागे गेले. शरद पवार यांचा पक्ष आणि चिन्ह हिरावून घेण्यासाठी ज्यांनी सह्या केल्या त्यांना, जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी येत्या माढा विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करा असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केले. शनिवार पासून अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक प्रचार सुरू केला आहे. पहिल्या दिवशी पाटील यांनी देगाव,बिटरगाव अजूनसोंड येथे जंगी सभा घेतल्या. या सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात सलग सहा टर्म आमदार असणाऱ्या बबनराव शिंदे यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील या एका शेतकरी पुत्राने थेट जेरीस आणले आहे. तुतारी वाजवणारा माणूस या शरदचंद्र पवार गटाच्या चिन्हावर लढणाऱ्या अभिजीत पाटील यांचा सामना बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांच्यासोबत होणार आहे.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, माढा मतदारसंघात अनेक विषय जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. गेल्या ३० वर्षात सत्ता असूनही यांना शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. सोबतच यांनी 30 वर्षात जेवढा विकास केला नाही तेवढा विकास मला निवडून दिल्यास मी केवळ पाच वर्षात करून दाखवतो असे आवाहनही लोकांना केले. पवार साहेबांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील पोराला उमेदवारी देऊन आशिर्वाद दिला असल्याचे ही पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी गावोगावचे अनेक प्रमुख मान्यवर, तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. अशा मध्येच ४२ गावांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले.