अभिजित पाटलांनी आमदारकीसाठी थोपटले दंड

माढयातून विधानसभा लढण्याचे फिक्स : आ.बबनदादा शिंदे यांच्या समोर प्रथमच तगडे आव्हान

पंढरपूर : ईगल आय न्यूज

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आमदार होण्यासाठी दंड थोपटले आहेत. पंढरपूर की माढा हा संभ्रम दूर करीत अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा निवडणुकीत गुलाल खेळण्याचा निर्धार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून माढा विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजवणाऱ्या आ.बबनदादा शिंदे यांच्यासमोर पहिल्यांदाच प्रचंड मोठे आव्हान उभा राहिले आहे.

विठ्ठल सहकारीचे चेअरमन अभिजित पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती. मध्यंतरी त्यांची माढा मधून लढण्याची चाचपणी सुरुच होती. त्यामुळे अभिजित पाटील नेमके कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढणार याकडे दोन्ही मतदारसंघाचे लक्ष लागले होते. स्वतः अभिजित पाटील हे सुध्दा कोणत्या मतदारसंघातून लढावे याविषयी संदिग्ध होते, असे दिसून येत होते. मात्र आता पाटील यांनी माढा मधून लढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे पाटील यांनी माढा विधानसभा जिंकण्यासाठी दंड थोपटले आहेत.

रविवारी टेंभुर्णी येथे माढा केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. यानिमित्ताने अभिजित पाटील यांनी माढा मधून निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. गेल्या महिन्याभरापासून पाटील यांनी माढा तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश असून माळशिरस तालुक्यातील १४ गावांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे पंढरपूरच्या ४२ गावातून पाटील यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत होत आहे. तर माळशिरस च्या १४ गावातून ही मोठा प्रतिसाद मिळत आहे. माढा मतदारसंघात गेल्या ३० वर्षांपासून आ.बबन दादा शिंदे आमदार आहेत.मात्र त्या तुलनेत माढा मतदारसंघाचं विकास झालेला नाही, रस्ते, आरोग्य सेवा, उद्योग, पिण्याचे शुद्ध पाणी, शिक्षण सुविधांपासून अद्यापही तालुका वंचित आहे. त्यातच आता बबनदादा शिंदे यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याने माढा तालुक्यातही यंदा भाकरी फिरवायची असा मुड दिसतो आहे.

३० वर्षे संधी देऊनही अपेक्षित विकास झालेला नाही तर पुन्हा त्याच घरात आमदारकी देऊन नवीन बदल कसा घडणार असा सवाल माढा मधील जनता विचारू लागली आहे.त्यामुळे अभिजित पाटील यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिसतो आहे. अभिजित पाटील यांनी गेल्या दोन महिन्यात या मतदारसंघात गाठी – भेटी सोबतच विविध लोकप्रीय कार्यक्रम घेऊन धुरळा उडवून दिलेला आहे.

आजवरच्या निवडणुकीत एवढ्या ताकदीचा स्पर्धक प्रथमच समोर उभा राहिल्याने आ.बबनदादा शिंदे हे सुध्दा काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. अभिजित पाटील यांच्या तगड्या आव्हानासमोर रणजित शिंदे कसे उभा राहतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे. अभिजित पाटील यांचा पक्ष अद्याप निश्चित झालेला नसला तरी बबन दादा शिंदे यांनीही अद्याप पक्ष ठरवलेला नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार सध्या व्यक्तिगत पातळीवर तयारी करीत असल्याचे दिसते. यामध्ये अभिजित पाटील यांनी सुरुवातीलाच आघाडी घेतल्याचे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!