अभिजित पाटील यांना तुतारी मिळाल्याने शिंदे गटात अस्वस्थता
पंढरपूर : प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने श्री विठ्ठल साखरे साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. अभिजीत पाटील यांची उमेदवारी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजीतसिंह शिंदे यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. अभिजीत पाटील यांचे पाठीशी मोहिते पाटील यांची ताकद पूर्णपणे उभे राहणार आहे, याशिवाय माढा तालुक्यातील सर्व स्थानिक नेते मंडळी अभिजीत पाटील यांच्यासोबत असल्याने ३० वर्षात प्रथमच आ. बबनदादा शिंदे यांच्यासमोर मोठ्या ताकदीचे आव्हान उभा असल्याचे दिसत आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी गेल्या महिन्याभर रस्सीखेच सुरू होती. आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवार गटात असले तरी त्यांनी महायुती मधील पक्षाची उमेदवारी नाकारली आणि माढा तालुक्यातील जनतेचा कौल लक्षात घेऊन तुतारी चिन्ह मिळावे यासाठी शरद पवार यांच्याकडे मनधरणी सुरू केली होती. मात्र राष्ट्रवादीमधील फुटीच्या वेळी आमदार बबनदादा शिंदे हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेल्यामुळे नाराज झालेल्या शरद पवारांनी बबनदादा शिंदे यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे सोमवारी बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या चिरंजीवाचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरलेला आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून मोठा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. केसरी कुस्तीस्पर्धा, माढा येथील कृषी प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सव याशिवाय गावोगावी घेतलेला खेळ पैठणीचा कार्यक्रम या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी माढेकरांना आपल्या व्यवस्थापन कौशल्य, संघटन कौशल्याची व विकासाच्या व्हिजनची कल्पना दिलेली आहे. एकूणच अभिजीत पाटील यांच्या कामाचा झंजावात पाहता माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.
अभिजीत पाटील यांनी उभा केलेले आव्हान पाहता माढा मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा थांबण्याचा निर्णय घेतल्याची दिसत आहे. माढा तालुक्यातील सर्व स्थानिक नेतेमंडळी या सर्वांनी अभिजीत पाटील यांचे नावास संमती दर्शविल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी अभिजीत पाटील यांना मिळालेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी हे चिन्ह मोठ्या प्रमाणात चर्चेत आले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही धैर्यशील मोहिते पाटील एक लाख वीस हजार अधिक मतांनी निवडून आलेले आहेत.
त्यामुळे मतदारसंघातील तुतारी चिन्हाची क्रेज, अभिजीत पाटील यांनी ऊसदरात आघाडी घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मिळवलेली सहानुभूती, शरद पवारांचा करिष्मा, मोहिते पाटील यांचे भक्कम पाठबळ, माढा तालुक्यातील स्थानिक नेत्यांचे साथ याच्या जोरावर अभिजीत पाटील माढाचे मैदान मारतील असे सांगितले जाऊ लागले आहे. आमदार बबनदादा शिंदे गेले 30 वर्षे माढ्याचे आमदार असले तरी पहिल्यांदाच त्यांच्यासमोर अतिशय प्रबळ आव्हान उभा राहिलेले आहे. अभिजीत पाटील यांचे आव्हान लक्षात घेऊनच आमदार बबनदादा शिंदे आपल्या मुलास आमदार करण्यासाठी दिवस रात्र एक करत असल्याचे दिसते आहे.