मदतीचा ना संस्थेला फायदा ना सभासदांना : राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक पवार यांची खा. पवारांकडे तक्रार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
दर वेळी आपण कल्याणराव काळे यांना कारखान्यासाठी मदत करीत राहिलो मात्र प्रत्येक निवडणुकीत काळे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. त्यामुळे यापुढे काळे यांना मदत करताना आपल्या विचारांचे जे सभासद आहेत त्याचे सभासदत्व परत द्यावे अशी सूचना करूनच मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष ऍड दीपक पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली आहे.
खा. पवार हे मंगळवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते तेव्हा ऍड पवार यांनी खा. पवार यांना लेखी पत्र देऊन सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रात ऍड. पवार पुढे म्हणतात की, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास आपण वेळोवेळी मदत केलेली आहे. मात्र ती मदत न संस्थेला मिळाली ना शेतकऱ्यांना, सभासदांना तिचा फायदा झाला. एवढे करूनही कल्याणराव काळे यांनी 2009 विधानपरिषद, 2014, 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे. दरवेळेस पक्षाच्या सभासद, कार्यकर्त्यांना दिलेला त्रास माफ करून ही मदत केलेली आहे. परंतु या मदतीचा संस्थेला, सभासदांना फायदा झालेला नाही, तर काळे यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या गोष्टीचा उपयोग करून घेतला आहे.
काळे यांचे राजकीय उपयोगिता मूल्य शून्य तसेच काळे यांच्या प्रभावक्षेत्रात मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाने चांगले मताधिक्य मिळवले आहे. त्यावरून काळे यांचे राजकीय उपयोगीतामुल्य शून्य झाले असल्याचाही दावा ऍड. पवार यांनी या पत्रात केला आहे. यावेळी खा. पवारांनी ऍड. पवार यांच्या पत्राची दखल घेत त्यांचे म्हणेनही ऐकून घेतले आणि आपण काळे यांच्याशी बोलून घेऊ अशी ग्वाही दिली.
आताही संस्था अडचणीत असून आपल्याकडे काळे मदतीसाठी हेलपाटे घालत आहेत. संस्था चांगली चालली पाहिजे असे आमचेही मत आहे. मात्र काळे यांनी मागील निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने 1 हजाराहून जास्त सभासद कमी केले. आता पुढील वर्षी मे महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित असताना परत चुकीच्या पद्धतीने सभासद कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सर्व अन्यायग्रस्त सभासद हे आपल्या पक्षाचे आहेत. त्यामुळे आपल्या सभासदांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन मदत करावी अशीही सूचना या पत्रात केली आहे.