अवताडेंच्या कार्यक्रम पत्रिकेत परिचारकांना शेवटचे स्थान


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अवताडे शुगर्स चा गाळप हंगाम शुभारंभ


प्रतिनिधी : पंढरपूर 


ज्या माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या मदतीने उद्योगपती समाधान अवताडे  आमदार झाले, त्याच परीचारकांना आ. समाधान अवताडे यांच्या कार्यक्रम पत्रिकेत चक्क शेवटचे स्थान देण्यात आले आहे. यावरून अवताडे आणि परिचारक यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.


आ. समाधान अवताडे यांच्या अवताडे शुगर्स या साखर कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता होत आहे. या कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. त्यामध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे दोन्ही खासदार, जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील,  विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील, आ. गोपीचंद पडळकर , अपक्ष आ.राजेंद्र राऊत,  शिंदेसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचीही नावे आहेत. 


विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत माजी आम.प्रशांत परिचारक यांचे नाव अगदी शेवटच्या स्थानी आहे. त्यांच्या अगोदर इतर जिल्ह्यातील आणि इतर पक्षाचे तसेच अपक्ष आमदारांचीही नावे आहेत. नावातील हा क्रम केवळ आजी आमदार आणि माजी आमदार या प्रोटोकॉलनुसार आहे की, बदलता राजकीय प्राधान्यक्रम यासाठी लावण्यात आला आहे, यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.


आ.अवताडे आणि माजी आ.परिचारक यांच्यात मागील 6 महिन्या पासून धुसफूस सुरू आहे. एकमेकांना अडवण्याचे आणि बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. वास्तविक विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी मदत केली नसती तर समाधान  अवताडे आमदार झालेच नसते. तरीही त्यांच्याकडून परिचारक यांना डावलून काही कामांसाठी पुढाकार घेतला गेल्याची चर्चा आहे. तर परिचारक समर्थकांनी दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अवताडे यांच्या पॅनल चा दारुण पराभव केल्याची सल अवताडे समर्थकांना लागली आहे.


यातूनच अवताडे आणि परिचारक यांच्यात अंतर्गत खडाखडी रंगली असून अवताडे शुगर्स च्या कार्यक्रम पत्रिकेत परिचारक यांना शेवटचे स्थान देत अवताडे यांनी पुढील राजकीय वाटचालीतील आपला प्राधान्यक्रम दाखवून दिल्याची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!