‘एक’मत होईना, दोन्ही तालुक्यात चालणारा चेहरा नाही
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार निवडीसाठी बैठकीच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र सक्षम उमेदवार मिळत नाही, मतविभागणी टाळण्यासाठी ‘एका’ एकमत होत नाही, आणि दोन्ही तालुक्यात स्वीकारला जाईल असा उमेदवार पक्षाला मिळत नाही. जातीय समीकरणे जुळवण्यासाठी बाहेरून उमेदवार आयात करण्याची चाचपणी केली, मात्र त्यात ही अपयश आले आहे. त्यामुळे अजूनही भाजपचा उमेदवार निश्चित होत नाही.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचे निश्चित केले असून, आजघडीला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांचे नाव निश्चित समजून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र भाजपला अजूनही निवडून येऊ शकेल असा उमेदवार मिळाला नाही. आ.प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत असे दिसते. तर दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्या नावाची चर्चा भाजपकडून सुरू आहे, मात्र त्यांना भाजपचे चिन्ह कमळ नको आहे असे समजते.
मतदारसंघात असलेली धनगर समाजाची मोठी मतदार संख्या लक्षात घेऊन माजी मंत्री राम शिंदे यांच्या नावाचीही भाजपने चाचपणी केली. नगराध्यक्ष सौ साधना भोसले, स्वेरी चे प्रमुख डॉ.बी. पी. रोंगे, dvp उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांच्या नावाचीही भाजपकडून चर्चा झाली आहे. मात्र अद्याप एकाही नावावर एकमत झालेले नाही. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत उमेदवारी बाबत खलबते सुरू आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात समाधान अवताडे यांची उमेदवारी पंढरपूर शहर आणि 22 गावात परिणामकारक ठरत नाही, तर प्रशांत परिचारक यांच्या मंगळवेढा तालुक्यातील मर्यादा मागील दोन निवडणुकीत स्पष्ट झालेल्या आहेत. भालके यांचा मात्र दोन्ही तालुक्यात चांगला प्रभाव असून हीच राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे.
हे लक्षात घेऊन भाजपकडून आम.परिचारक आणि अवताडे यांच्यात ऐक्य घडवून दोघांच्या राजकीय ताकदीची गोळा बेरीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी कुणाला मिळते याची प्रतीक्षा अजूनही लागलेली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.