आता परिचारकांवर भाजपची भिस्त !


बाहेरचे नेते निष्प्रभ : मोहिते-पाटील कोरोनामुळे जाय बंदी

पंढरपूर : ईगल आय मीडिया


भाजपने प्रतिष्ठेच्या बनवलेल्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक प्रचाराच्या मध्यावर आलेली असताना भाजपसाठी अडचणीची झालेली आहे. हातातून निसटत असलेली ही लढाई जिंकण्यासाठी भाजपची भिस्त आता केवळ परीचारकांवर आहे. प्रचारासाठी आलेले बाहेरचे नेते निष्प्रभ ठरत असतानाच, ज्यांनी निवडणूक हातात घेतली होती आणि चांगली पकड निर्माण केली होती ते आ.रणजीतसिंह मोहिते पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जायबंदी झाले आहेत. त्यामुळे आता ही लढाई जिंकण्यासाठी भाजपला एकमेव परीचारकांचाच आधार उरलेला आहे.


राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली. भाजपने या निवडणुकीत उद्योजक समाधान अवताडे यांना उतरवले आणि मतांची गोळाबेरीज करण्यासाठी आ.प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते – पाटील यांना पुढे केले होते. पहिल्या टप्प्यात मोहिते – पाटील, परिचारक यांनी प्रचारात चांगले मैदान मारले होते. मात्र 4 दिवसांपूर्वी आ.रणजितसिंह मोहिते – पाटील कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ते प्रचारातून बाहेर पडले. त्यानंतर भाजपने खा.रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, सदाशिव खोत, राम शिंदे, बाळा भेगडे, लक्ष्मण ढोबळे, आ.राम सातपुते, आ.गोपीचंद पडळकर यांच्या सारखी टीम उरतवली असली तरी या नेत्यांना आपला प्रभाव पाडता आलेला नाही.

सोबत आलेल्या लोकांचीच सभेला अधिक गर्दी असते आणि सभा निरस होत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ही सभा आयोजित केल्या आहेत. मात्र त्यांच्या सभांना कितपत प्रतिसाद मिळतो याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या भाजपला ही निवडणूक जिंकण्यासाठी नातं केवळ आ.प्रशांत परिचारक यांचाच एकमेव आणि भक्कम आधार उरला आहे.

मंगळवेढा तालुक्यात अवताडे गटाची मोठी विभागणी होणार असल्याचे निश्चित दिसत आहे.तर पंढरपूर तालुक्यात अवताडे यांचा काहीच प्रभाव नाही. त्यामुळे उमेदवाराच्या नावावर, प्रतिमेवर भाजपला जिंकून येणे कठीण दिसत आहेत. अशा वेळी पंढरपूर शहर, तालुक्यात निर्णायक आणि मंगळवेढा तालुक्यातही प्रभाव असलेल्या आ. प्रशांत परिचारक यांच्यावरच भाजपची भिस्त असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!