भाजपच्या माजी खासदारांनी दिला राष्ट्रवादीच्या उमेदवारास पाठिंबा

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात 35 उमेदवार निवडणूक रिंगणात

टीम : ईगल आय मीडिया

भाजपचे बीड चे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आपला पाठिंबा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी चे उमेदवार सतीश चव्हाण यांना जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला हा धक्का असल्याचे मानले जाते.

दरम्यान भाजपला बुधवारी मोठा धक्का बसला असून माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि थेट राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण याना पाठिंबा दिला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 10 उमेदवारांनी माघार घेतली असून 35 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे अगोदरच नाराज असल्याची चर्चा असताना जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी ला पाठिंबा देऊन भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरवली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांचे चांगले वर्चस्व आहे. ते सलग तिसऱ्या विजयासाठी निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. यावेळी त्याना भाजपच्या शिरीष बोराळकर यांचे आव्हान आहे. माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे पदवीधर साठी इच्छुक होते मात्र पक्षाने त्यांचा विचारही केला नाही. याच कारणावरून जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका करीत बुधवारी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्याचवेळी गायकवाड राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली. सायंकाळी गायकवाड यांनी राष्ट्रवादी चे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर चव्हाण यांची भेटही घेतली. यामुळे भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!