रेस्ट हाऊसवर झाली 15 मिनिटे गुप्त चर्चा !
टीम : ईगल आय मीडिया
राज्यातील शिवसेना – राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असतानाच साताऱ्याचे भाजपचे आम शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. नुसतीच भेट घेतली नाही तर 15 मिनिटे त्यांच्यासोबत गुप्त चर्चा देखील झाली. त्यामुळेच जिल्ह्यातील राजकीय पटाची फेरमांडणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रविवारी खा. शरद पवार हे कोविड आढावा बैठकीसाठी कराड येथे आले होते. या ठिकाणी साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासकीय विश्राम गृहावर त्यांची भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. 3 नेत्यांमध्ये काय गुप्तगु झाली याबाबत उलट – सुलट चर्चा सुरू आहे.
शिवेंद्रसिंहराजे हे खा. पवार समर्थक मानले जातात. साताऱ्याच्या स्थानिक राजकारणात त्यांचा खा. उदयनराजे भोसले यांच्याशी नेहमी संघर्ष राहिला आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून आणि राज्यात भाजपची सत्ता पुन्हा येईल या अपेक्षेने विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ उदयनराजे भोसले सुद्धा भाजपवासी झाल्याने आणि राज्यात परिवर्तन होऊन सेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आल्याने शिवेंद्रसिंहराजे यांची कोंडी झाली आहे.
विकासकामे करण्यासाठी सत्तेसोबत जात आहे, असा दावा करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांना आता विकास कामे करून घेण्यासाठी सत्तेसोबत म्हणजेच पुन्हा परत स्वगृही येण्याचे वेध लागले आहेत. त्याच बरोबर भाजपने उदयनराजे भोसले यांना लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेवर घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे यांना पुढच्या काळात उदयनराजे यांच्यासोबत पुन्हा संघर्ष करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे यांचे मन आता भाजपमध्ये रमत नसल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळेच रविवारी कराड येथे शिवेंद्रसिंहराजे यांनी खा. शरद पवार यांची घेतलेली भेट आणि गुप्त चर्चा यावरून राजकीय खळबळ उडाली आहे.
यापूर्वी ही साताऱ्याला आल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उघड आणि जाहीरपणे भेट घेतलेली आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांची पावले परतीच्या प्रवासाला लागली आहेत काय याविषयी चर्चा रंगली आहे.