भागवत कराडांचा मंत्रीमंडळ समावेश : मुंडे समर्थकांना धक्का
टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्रात भाजप घराघरात पोहोचवणार्या गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारांचे पंख छाटण्याचे भाजपचे धोरण कायम असल्याने राज्यभरातील मुंढे समर्थकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली आहे. पंकजा मुंढे यांना विधान सभेला पराभूत करण्यास हातभार लावण्या सोबतच विधानपरिषद आणि राज्यसभा सदस्यत्वापासूनही त्यांना वंचित ठेवले गेले. एवढेच नाही तर दोन वेळा खासदार म्हणून निवडून येऊनही डॉ.प्रीतम मुंढे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे राज्यातील मुंढे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी करण्यात आला. यामध्ये बीडच्या खासदार, दिवंगत गोपीनाथ मुंढे यांच्या कन्या डॉ.प्रीतम मुंढे यांना संधी मिळेल असे मानले जात होते. दोनवेळा खासदार, शिवाय त्या उच्चशिक्षीतही आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळात समावेश करण्यासाठी ओबीसी व उच्चशिक्षित चेहरा या निकषात डाॅ.प्रिमत मुंडे बसत असतांना देखील त्यांना डावलण्यात आले. परंतु, तिसऱ्यांदा मुंडेंबाबत भाजपने असे धक्कातंत्र वापरले आहे. डॉ. कराड यांची राज्यसभेवर निवड झाली तेव्हाही पंकजा मुंडेंना विश्वासात न घेता त्यांचे नाव अंतिम करण्यात आले होते.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या अपरोक्ष त्यांना राज्यसभेची संधी दिली गेली. तर, विधान परिषदेच्या जागांसाठीही पंकजा मुंडे यांचा विचार न करता लातूरच्या रमेश कराड यांना संधी दिली गेली. त्यामुळे भाजपची मुंडेंबाबतची भूमिका अन्यायकारक असल्याचे बोलले जाते.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आलेल्या विधानपरिषद निवडणुकीत पक्ष पंकजा मुंढे यांचे पुनर्वसन करेल अशी अपेक्षा होती. एकीकडे त्या स्वत: विधानपरिषद निवडणुकी साठी कागदपत्रांची जुळवा जुळव करत असताना त्यांचेच समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली. पंकजा मुंडे बद्दल आपल्या मनात कुठल्याच प्रकारचा राग नाही हे दाखवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. तेव्हा झाले गेले विसरून त्या पुन्हा ताकदीने संघटन कामाला लागल्या होत्या. असे असतांना पुन्हा मुंडे भगिनींना डावलण्याचा प्रकार घडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपला बहुजन चेहरा मिळवून दिला. औरंगाबाद मध्ये मुंढे यांच्यामुळे डॉ. कराड यांच्या गळ्यात दोनदा महापौर पदाची माळ पडली होती. पण, आता ज्यांच्यामुळे कराड महापौर झाले, त्याच मुंडेंच्या वारसांना डावलून कराडांना केंद्रात मंत्री केले? यांचे मुंडे यांच्या समर्थकांना कोडे पडले आहे.
भलेही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी ओबीसी व मास लिडर ही त्यांची ओळख कायम आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व करत त्यांनी हे दाखवून दिले होते. मात्र असे असले तरी मोदी, शहा जोडीची मुंडे भगिनींवरची नाराजी अजूनही कायम आहे, हेच कराडांच्या मंत्रीमंडळ समावेशावरून सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.