भाजपचा प्रयत्न ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा

मात्र इच्छुकांची यादी वाढतेच आहे

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का द्यायचा असेल तर एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. मात्र इच्छुकांची यादी वाढतच असल्याने भाजपच्या या प्रयत्नांवर पाणी पडणार असल्याचे दिसत आहे. सर्व विरोधक एकत्र येऊन राष्ट्रवादी ला रोखणार की सहानुभूतीच्या लाटेवर मतविभागणीचा कळस चढवून राष्ट्रवादी आपली जागा राखणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी उमेदवार चाचपणी केली असून भालके कुटुंबाची उमेदवारी जवळपास अंतिम झाली आहे. मात्र विरोधात कोण उमेदवार असणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. भारतीय जनता पक्षाकडून 4 जण इच्छुक असले तरी उमेदवारी एकालाच मिळणार आहे, त्या चौघांचे पुन्हा एकमत होणार का ? ते चौघे एकाच उमेदवारास सहकार्य करणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

2014 आणि 2019 साली तिरंगी लढतीत मोठी मतविभागणी होऊन आम.भारत भालके यांचा विजय सोपा झाला होता. ती मतविभागणी टाळण्यासाठी भाजपकडून एकास एक उमेदवार देण्याची खेळी खेळली जात आहे. दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांचे नाव भाजपकडून सध्या तरी आघाडीवर आहे, त्याचबरोबर आ.प्रशांत परिचारक यांनीही इच्छुक असल्याचे सांगितल्याने या दोघांपैकी एक उमेदवार द्यायचा की दोघांची संमती होईल असा तिसरा कोणी तरी मैदानात उतरवायचा ? या शक्यतेची तपासणी केली जात आहे.

त्यासाठी परिचारक आणि अवताडे गटाला चालेल असा तिसरा उमेदवार भाजपकडून शोधला जात आहे. मात्र सध्या तरी अवताडे यांनी जोरदार तयारी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. शैला गोडसे यांनीही आता माघार नाही या निर्धाराने संपर्क वाढवला आहे. त्यामुळे गोडसे कुणाची मते खेचनार यावर ही निवडणूक निर्णय बदलला जाऊ शकतो.

शिवाय धनगर समाजाच्या वतीने एखादा उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याचा फटका भाजपलाच अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. एकंदरीत भाजपकडून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी सर्वसंमतीचा ‘तो एक’ उमेदवार कोण असेल ? याचा शोध सध्या सुरू आहे आणि आज किंवा उद्या त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!