दाखल गुन्हे , संपत्तीची निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली
पुणे : ईगल आय मीडिया
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंदक्रांत पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.विधानसभा निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना संपत्ती आणि त्यांच्याविरोधात असलेल्या दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपवल्याबद्दल त्यांच्याविरोधात दाखल तक्रारीची दखल घेत, चौकशी करण्याचे आदेश पुणे न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. केळकर यांनी दिले आहेत.
तथ्यहीन तक्रार : चंद्रकांत पाटलांचे ट्विट
आपल्या विरोधात केलेली तक्रार ही संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे.त्यामुळे,ती तथ्यहीन आहे असे ट्विट आ. चंदक्रांत पाटील यांनी केले आहे. न्यायालयात माझ्या विरुद्ध तक्रार केल्याचे मला बातम्यांमधूनच कळले असून,माझ्याकडे अजून न्यायालयीन आदेशाची नोटीस प्रत आलेली नाही त्यामुळे,मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही.ही तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे.त्यामुळे,ती तथ्यहीन आहे.निवडणूक अर्ज भरताना मी सर्व आवश्यक माहिती दिलेली आहे.तरी देखील कोणाला आक्षेप असल्यास उच्च न्यायालयात तो निवडणूक याचिका दाखल करू शकतो,असे पाटील या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
2019 साली कोथरूड विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार होते आणि त्या निवडणुकीत ते निवडून आले आहेत. ही निवडणुक लढवण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांनी संपत्ती आणि स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सादर केलेली नाही. चंदक्रांत पाटील यांनी सन २०१६ ते २०१९ दरम्यान उत्पन्नाच्या स्रोतबाबत खोटी माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात चंदक्रांत पाटील यांनी जाणूनबुजून ते मालक असलेल्या दोन कंपन्यांची माहिती लपविली असल्याची तक्रार डॉ.अभिषेक हरिदास यांनी न्यायालयात केली आहे.
त्यामुळे,त्यांच्याविरोधात खटला चालवून पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी याबाबत चौकशी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.