आक्रमक नाना पटोले यांचे भाजपसह राष्ट्रवादी ला ही असणार आव्हान !
टीम : ईगल आय मीडिया
आक्रमक ओबीसी नेता आणि विधानसभेचे सभापती नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पटोले यांनी गुरुवारी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला असून 24 तासात त्यांच्यावर राज्याची जबाबदारी टाकताना काँग्रेसने नवीन सुरुवात केली आहे. त्यांच्या जोडीला सहा कार्याध्यक्ष आणि 10 उपाध्यक्ष देण्यात आले आहेत. यामुळे आजवर बचावात्मक असलेली काँग्रेस आक्रमक होऊन ठाकरे सरकार अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
ओबीसी समाजघटक सर्वात जास्त असून गेल्या काही वर्षात हा घटक भाजपवर ही नाराज आहे, त्यामुळे हा वर्ग मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कडे गेल्यास काँग्रेसचे आणखी नुकसान होणार आहे. हे ओळखून गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे ओबीसी नेते ओबीसी मतांच्या तुष्टीकरणाचे प्रयत्न करीत आहेत. आणि याच धोरणाचा भाग म्हणून काँग्रेसने विदर्भात प्रभावी ओबीसी नेता, आक्रमक आणि कार्यक्षम अशा नाना पटोले यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.
विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समुदाय काँग्रेसची व्होट बँक राहिला आहे.मात्र मागील 10 वर्षात ओबीसी मतदार भाजपकडे तर अल्पसंख्याक वर्ग राष्ट्रवादी कडे झुकला आहे. मराठा समाज ही भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये मोठ्या प्रमाणात विभागल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ला केवळ 1 खासदार आणि 44 आमदार निवडून आणता आले. दोन्ही वेळ काँग्रेस 4 थ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी नव्या दमाच्या आणि ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य दिल्याचे दिसते.
नव्या प्रदेश कार्यकारिणीत सहा जणांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचीही कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याशिवाय, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, कुणाल पाटील व नसीम खान यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलाश गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, माणिकराव जगताप, एम. एम. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारमध्ये एका बाजूला राष्ट्रवादी आक्रमक होऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत असताना काँग्रेसने आक्रमक ओबीसी नेता पुढे केला आहे. पुढच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका महानगरपालिका निवडणुका येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्वपूर्ण बदल करीत नाना पटोले यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. ती देत असताना त्यांच्या जोडीला 6 कार्याध्यक्ष, 10 उपाध्यक्ष दिले आहेत. या जम्बो कार्यकारीणीत ओबीसी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांना मोठे स्थान दिले गेले आहे. यावरून पुढच्या काळात काँग्रेस बचावात्मक नाही तर आक्रमक राजकारण करेल आणि त्यामुळे भाजप राष्ट्रवादी समोर मोठे आव्हान उभा राहील आणि राज्य सरकार सुद्धा अस्थिर राहील असे मानले जात आहे.