नवीन कार्यकरिणी : जुन्याच चेहऱ्याची गर्दी

नात्या – गोत्यात, निष्प्रभ नेत्यांत गुरफटली काँग्रेस

टीम : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीकडे पाहिल्यानंतर काँग्रेस पक्ष पुन्हा 20 वर्षे मागे गेल्याचे दिसत आहे. एक तर काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीत निष्प्रभ झालेले जुने चेहरे आहेत आणि जे काही नवीन चेहरे समोर आले आणलेले आहेत त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचाच गोतावळा अधिक दिसून येत आहे.

राज्यात सत्ता सहभाग असूनही काँग्रेसला अधिक प्रभावी, नवीन चेहरे शोधता आलेले नाहीत. आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जुन्या निष्प्रभ नेत्यांसह त्यांच्याच गोतावळ्यातील नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन ही कार्यकरिणी करावी लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे जुन्या दारू गोळ्यांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष कसा सामोरा जाणार, आक्रमक भाजप, शिवसेना आणि नियोजनबद्ध राष्ट्रवादी शी कसा लढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुरुवारी काँग्रेसच्या राज्य कार्यकरिणीस पक्षाचे महासचिव सी वेणूगोपाल यांनी मान्यता देत नवीन नावांची घोषणा केली. त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. त्याचबरोबर माजी आ. दिवंगत माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील – उंडाळकर, आशिष देशमुख, विशाल पाटील ( सांगली ), अशोक पाटील – निलंगेकर, धीरज देशमुख, शैलेश शिवराज पाटील-चाकूरकर अशा जुन्याच काँग्रेस नेत्यांच्या वारसांना संधी दिली आहे.

तसेच ज्यांचा सध्याच्या राजकीय क्षेत्रात कसलाही प्रभाव उरलेला नाही नाही अशा अनेक माजी आमदार, खासदार आणि माजी महापौर मंडळींना कार्यकारिणीत स्थान देऊन रिकाम्या जागा भरण्याची धडपड केल्याचे दिसून येते. हे निष्प्रभ नेते काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यात कितपत यशस्वी होतात याबाबत भले मोठे प्रश्नचिन्ह उभा राहीले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या 190 जणांच्या कमिटीमध्ये मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय. दरम्यान, काँग्रेसच्या या 190 जणांच्या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पक्षाचे सर्व माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, राज्य सरकारमधील माजी मंत्री यांना कार्यकारिणीत बसवण्यात आलेलं आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडेही जनरल सेक्रेटरी पद देण्यात आलंय. तरत सचिन गुंजाळ हे सचिवपदी असणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!