9 वर्षांनी प्रकाश तात्या ‘ऍक्टिव्ह मोड’ वर !

पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह

पंढरपूर : ईगल आय मीडिया

2012 च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर लोकसभा वगळता सक्रिय नसणारे काँग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह मोड वर आले आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता असूनही अस्तित्वासाठी संघर्ष करीत असलेल्या पंढरपूर तालुका काँग्रेस मध्ये उत्साह संचारला असल्याचे दिसत आहे.

जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक प्रकाश पाटील ( तुंगतकर) यांच्याकडे मागील 20 वर्षांपासून पंढरपूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. या माध्यमातून त्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद, त्यांच्या सौभाग्यवतीना जिल्हा परिषद सदस्यपद ही पटकावले. मात्र 2012 च्या जि.प.निवडणुकीनंतर प्रकाश पाटील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी असूनही सक्रिय दिसत नव्हते.

लवकरच तालुक्यातील 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत, पुढील वर्षी डिसेंम्बर आणि 2022 च्या फेब्रुवारी मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर तात्यांचे सक्रिय होणे, आणि राज्यात सत्ता असणे या दोन्ही गोष्टी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी तसेच काँगेस पक्षासाठी शुभचिन्ह मानल्या जात आहेत.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारात ते आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर पुन्हा ते आपल्या सु.रा.परिचारक पतसंस्थेच्या कारभारात गुरफटून जात होते. या काळात त्यांच्याकडून पक्षाच्या कार्यासाठी अपेक्षित वेळ दिला जात नसल्याच्या तक्रारी कार्येकर्ते करीत होते. गेल्या काही वर्षात शहर अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर असलेले ऍड. राजेश भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अधून मधून काँग्रेसचे अस्तित्व दिसून यायचे.

मात्र काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असताना ते सक्रिय नसल्याने पक्षाचे नुकसान होत आहे, कार्यकर्ते हतबल झाल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकाशतात्या सक्रिय झाले आहेत हे पाहून निष्ठावंत कार्यकर्त्यांना हुरूप आलेला आहे. सोमवारी रखरखीत उन्हात ही तात्या आंदोलनासाठी रस्त्यावर आल्याचे पाहून कार्यकर्तेच नाहीत तर सर्व सामान्य नागरिक ही चकित झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

error: Content is protected !!