महापौर निवडीसाठी शिवसेना – राष्ट्रवादी एकत्र येणार
टीम : ईगल आय मीडिया
सांगली आणि जळगाव महापालिकेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.
अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. अहमदनगर महापालिकेतील महापौर पदाची मुदत 30 जून रोजी संपत आहे.
अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा महापौर आहे. मात्र, आता शिवसेनेचा उमेदवार देण्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
महापौर पदासाठी शिवसेनेकडे रोहिणी शेंडगे आणि
रिता भाकरे या दोन उमेेेदवार आहेत तर शीला चव्हाण काँग्रेस आणि
रोहिणी पागीरे राष्ट्रवादी कडे आहेेेत. मात्र भाजपकडे उमेेेदवार नाही.
अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.
अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे. महापौर पदासाठी महाविकास आघाडी प्रमाणे नगरमध्ये सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार की नवीन समीकरणे पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी करून भाजपला पाय उतार करण्यावर एकमत झाले आहे.
असे आहे अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना- 23
राष्ट्रवादी-18
भाजप-15
काँग्रेस-5
बसपा-4
सपा-1
अपक्ष-2
काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यात संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महापौर भगवान फुलसौदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजीराजे कदम, मा सभागृह नेते अनिल शिंदे, शिवसेना गट नेते संजय शेंडगे हे उपस्थित होते.