काँग्रेस पक्षातून सुशील पर्वाचा अस्त ?

पक्ष संघटना फेररचनेत सुशीलकुमार शिंदे यांना डावलले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, हाय कमांडच्या खास मर्जीतील अशी ओळख असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शुक्रवारी जाहीर केलेल्या पक्ष संघटनेच्या फेररचनेत कुठेही स्थान दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधून सुशील पर्वाचा अस्त झाल्याचे मानले जाऊ लागले आहे. परिणामी, सोलापूर जिल्ह्यातही ” शिंदे साहेब” या प्रभावशाली नावाला आणखी अवकळा येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी वाचा !

काँग्रेस पक्षसंघटनेत सुशीलकुमार शिंदे यांना मागील 4 दशकांत मानाचे स्थान होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या खास वर्तुळात त्यांचा समावेश असायचा. काँग्रेस पक्षात दलित समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळेच राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री म्हणूनही शिंदे यांना पक्षाने मिरवले. त्यांना केंद्रिय ऊर्जामंत्री, गृहमंत्री, लोकसभेतील पक्षनेते, सरचिटणीस, विविध राज्याचे प्रभारी अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. शिंदे यांच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी आवर्जून सोलापूर मतदारसंघात येत होते.

2014 आणि 2019 असे सलग दोनवेळा शिंदे यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. एवढेच नाही तर त्यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागला. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकच आमदार निवडून आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर सुशीलकुमार शिंदे यांचा कसलाही प्रभाव राहिलेला नाही. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या अधोगतीला सावरण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी कसलेही प्रयत्न केलेले नाहीत.

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँग्रेस हाय कमांडच्या लेखी सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय महत्व संपले असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षात असलेले सरचिटणीस अन्य राज्याचे प्रभारी पद दोन वर्षांपूर्वीच काढून घेतले गेले. राहुल गांधी अध्यक्ष असतानाच शिंदे, चव्हाण अशा जेष्ठ नेत्यांना बाजूला सारण्याचे काम सुरू झाले आहे.

त्यानंतर शुक्रवारी पक्ष संघटनेत झालेल्या फेररचनेत शिंदे यांना कसलेही स्थान दिले गेले नाही. जेष्ठांसाठी असलेल्या निमंत्रित, विशेष निमंत्रित यामध्ये ही शिंदे यांना स्थान दिले नाही. राजीव सातव, रजनी पटेल, मुकुल वासनिक अशा नव्या दमाच्या नेत्यांकडे पक्षाने जबाबदारी देतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पक्ष संघटनेत कसलेही स्थान दिले नाही.त्यामुळे जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांतही नाराजी निर्माण झाली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाच्या जीवावर मोठ , मोठी पदे मिळवली मात्र त्यांचा संघटनेला फायदा झालेला नाही. पक्ष अडचणीत असताना त्यांच्याकडून पक्षाला कसलेही मार्गदर्शन झालेले नाही. काँग्रेसवर सध्या राहुल गांधी यांचा प्रभाव असून त्यांच्या दृष्टिकोनातून शिंदे यांचे उपयोगिता मूल्य संपलेले आहे.राज्याच्या राजकारणातही त्यांचे महत्व आणि प्रभाव संपलेले आहे. यावरून काँग्रेस पक्षातून सुशील पर्वाचा अस्त झाल्याचे मानले जात आहे.

One thought on “काँग्रेस पक्षातून सुशील पर्वाचा अस्त ?

  1. शिंदे साहेबांनी दलित म्हणून मोठी राजकीय पदे मिळवली पण त्याचा फायदा ना दलितांना ना काँग्रेस पक्ष संघटनेला…. कडक पाऊल ..योग्य संदेश

Leave a Reply

error: Content is protected !!