कोल्हापूर भाजपमध्ये बंडाचे निशाण !

प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

टीम : ईगल आय मीडिया

पुणे विभागीय पदवीधर निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगले तालुक्याचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा ज्या पद्धतीनं पराभव झाला, तो पक्षातील व परिवारातील जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला लागला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील व जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे या दोघांवर निवडणुकीची प्रामुख्यानं जबाबदारी होती. मात्र, या दोघांनीही ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही.

बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर विसंबून राहून एकतर्फी विजय होईल, अशा भ्रमात ते राहिले. त्यांनी ही निवडणूक व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळंच भाजपचा एवढ्या मोठ्या फरकानं पराभव झाला,’ असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

‘या निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही ही मागणी करत आहोत, असं यावेळी शिवाजी बुवा व पी. डी. पाटील यांनी स्पष्ट केलं.

शिस्तबद्ध पक्ष अशी भाजपची ख्याती असताना आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्यामुळे भाजपमध्ये बंडाचे हाकारे सुरू झाल्याचे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!