बिबट्याची शिकार होणार की, सापळा फस्त होणार ?

धवलसिंहांचा पक्ष प्रवेश फायदेशीर ठरणार का ?

बिबट्याची शिकार डॉ.धावलसिंहांनी केली खरी, भाजपची शिकार त्यांच्याकडून होईल का ?

टीम : ईगल आय मीडिया

जनसेवा संघटनेचे प्रमुख डॉ.धवलसिंह मोहिते – पाटील यांनी गुरुवार ( दि. 28 जाने.) रोजी मुंबईत जाऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशा वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि धवलसिंह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी धवलसिंह यांनी भाजपरूपी बिबट्याची शिकार करावी, त्यांचा प्रवेश सोलापूर जिल्ह्यात पक्षाला पुन्हा उभारी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, धवलसिंह यांची राजकीय वाटचाल, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा सर्व सामान्य जनतेतील वावर, लोकसंपर्क लक्षात घेता काँग्रेस नेत्यांचा भ्रमनिरास होण्याचीच शक्यता अधिक आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते – पाटील यांची माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते – पाटील यांचे सुपुत्र, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचे पुतणे एवढीच त्यांची जिल्ह्याबाहेर ओळख आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर, जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा, शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी जि. प. सदस्य आणि अलीकडच्या काळातील बिबट्याचे कर्दनकाळ अशीच काय ती ओळख आहे.

गेल्या काही वर्षात त्यांनी शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी या पक्षांची साथ – सांगत करून पहिली मात्र कुठं ही ते आपलं संघटन कौशल्य, नेतृत्व सिद्ध करू शकले नाहीत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना फारसे काही यश मिळाले नाही. त्यांच्या गटाच्या किती ग्रामपंचायती निवडून आल्या याचा ताळमेळ अजूनही लागलेला नाही. पूर्वजांच्या पुण्याईवर राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत हे त्यांच्या आणि समर्थकांच्या लक्षात आलेले नाही असे दिसते. मात्र विशेष हे आहे की काँग्रेस नेतृत्वाच्यासुद्धा हे निदर्शनास आलेले नाही. अन्यथा त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एवढी मोठी स्वप्ने या जुन्या – जाणत्या पक्षाच्या नेत्यांना पडली नसती.

या व्यतिरिक्त धवलसिंह मोहिते – पाटील यांच्या कार्य, कर्तृत्वाची वेगळी अशी ओळख नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा अतिशय मर्यादित होत गेली असून, एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यात दरारा निर्माण केलेल्या प्रतापसिंह यांचा जनसंपर्क, राजकिय करिष्मा धवलसिंह यांना टिकवता आणि निर्माण करून दाखवता आलेला नाही. एवढेच नाही, आजही धवलसिंह यांच्या पेक्षा त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते -पाटील यांचा राजकीय दबदबा अजूनही अधिक आहे.

राजकीय आणि सामाजिक जीवनात नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागत, धवलसिंह यात कमी पडले आहेत हे वास्तव त्यांच्या समर्थकांच्या पचनी पडणारे नसले तरी वास्तवात झाकले जाणार नाही. गेल्या 20 वर्षात सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस दर दिवशी उणे होत गेलेली आहे. आता जिल्ह्यात या पक्षाला कोणीही वाचवू शकणार नाही, हे कटू असले तरी सत्य आहे.

अशा परिस्थितीत डॉ. धवलसिंह यांच्या सारखा शिकारी आपल्या अभयारण्यात आला आणि त्याने भाजपरूपी बिबट्याची शिकार केली तर किती बरे होईल, असा भाबडा आशावाद काँग्रेस श्रेष्ठींचा भ्रमनिरास करणारा ठरेल. डॉ. धवलसिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपची शिकार करू पाहत असताना हा बिबट्या (भाजप ) काँग्रेसचा उरला – सुरला सांगडाही फस्त करेल याचीच शक्यता अधिक.

Leave a Reply

error: Content is protected !!