नाथाभाऊंसाठी ‘ या ‘ मंत्र्यांना करावा लागणार ‘त्याग’ ?

पुणे जिल्ह्यातील मंत्र्यांवर येणार गंडांतर

टीम : ईगल आय मीडिया

भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळात जागा करण्यासाठी अगोदरच खुर्ची तयार ठेवली असून पुणे जिल्ह्यातील जेष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता असून नाथाभाऊसाठी जेष्ठ मंत्र्यांना त्याग करावा लागणार असल्याचे मानले जात आहे.

राजकीयदृष्ट्या जन्मजात भाजपमध्ये असलेल्या नाथाभाऊ खडसे यांनी भाजपला अखेर जय श्रीराम केला असून आज त्यांचा नव्या घरात प्रवेश होऊन नव्या संसाराला सुरुवात होत आहे. एकनाथ खडसे यांचे जेष्ठत्व, त्यांचा खानदेशात असलेला प्रभाव आणि भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नाथाभाऊ ना मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचे मानले जाते. मात्र सध्या राष्ट्रवादी च्या कोट्यातील सगळी मंत्रीपदे भरली आहेत, त्यामुळे कुणाला तरी राजीनामा द्यावा लागणार आहे.

राष्ट्रवादी च्या कोट्यातून पुणे जिल्ह्यात 3 मंत्रीपदे आहेत. बाकी इतर जिल्ह्यात विभागीय समतोल साधण्यासाठी मंत्रीपदे दिली गेली आहेत. पुणे जिल्ह्यात 3 पैकी 1 मंत्रीपद काढून ते नाथाभाऊंना देण्याची तयारी चालवली आहे. यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खुर्चीला हात लावता येत नाही. त्यामुळे प्रकृती च्या कारणास्तव मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी करू न शकलेले जेष्ठ नेते दिलीप वळसे – पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते आणि त्यांच्या जागी नाथाभाऊ खडसे यांची वर्णी लावली जाईल असे बोलले जाते.

सध्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी च्या कोट्यात 14 मंत्री आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे हे ओबीसी प्रवर्गातील आहेत तर दोन मुस्लिम आणि एक अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. सामाजिक समीकरणे आणि ओबीसींचा कोटा लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंढे या दोघांपैकी एकाला त्याग करण्यास सांगितले जाईल अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

मुंढे आणि आव्हाड यांच्यापैकी एकास प्रदेशाध्यक्षपद देऊन पक्ष कार्यासाठी जोडले जाईल असेही सांगितले जाते. मात्र मराठवाड्यात धनंजय मुंढे यांचे महत्व मोठे आहे तर आगामी मुंबई मनपा निवडणूक लक्षात घेता आव्हाड यांच्याकडील मंत्रिपदाची जबाबदारी अत्यावश्यक आहे. त्या तुलनेत दिलीप वळसे पाटील यांना वगळणे पक्षाला सोयीस्कर ठरणार मानले जाते. त्यामुळेच दिलीप वळसे पाटील यांना नाथाभाऊसाठी त्याग करावा लागेल असेही समजते.

Leave a Reply

error: Content is protected !!