माजी मंत्री देशमुख भाजपला जय श्रीराम करणार

काँग्रेस मध्ये प्रवेश निश्चित झाला.

टीम : ईगल आय मीडिया

माजी अर्थ राज्यमंत्री व विदर्भातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख लवकरच काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय झाला आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवशी मुंबईतील कार्यक्रमात ते घरवापसी करणार असल्याची माहिती आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपला धक्के बसत आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव, सांगली व जळगाव महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यामुळं भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हं नसल्यानं निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आलेले अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्यातूनच आता घरवापसी सुरू झाली आहे.

सुनील देशमुख हे २००४ साली अमरावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. त्याशिवाय, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा संजय घोडके यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला.

प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्याचा दौरा सुरू केला आहे. काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षापासून दुरावलेल्या जुन्या-जाणत्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यावरही त्यांचा भर आहे. सुनील देशमुख यांची घरवापसी हे त्याच प्रयत्नांना आलेलं यश मानलं जात आहे. तर, गेल्या काही वर्षांपासून विदर्भात जम बसवणाऱ्या भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!