राष्ट्रवादी च्या नेत्यांशी जवळीक वाढली
सोलापूर : ईगल आय मिडिया
सोलापूर शहर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलीप माने यांनी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्या निवडणुकीत माने यांचा पराभव झाला होता. आता माने ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे.
आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलीप माने इच्छुक आहेत, मात्र सोलापूर विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. तिन्ही पक्षांची मदत मिळेल असा अंदाज लावून मानेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जवळीक वाढवल्याचं दिसत आहे.
दिलीप माने हे काँग्रेसच्या तिकीटावर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून 2009 मध्ये आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑगस्ट 2019 मध्ये काँग्रेसची साथ सोडत माने त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागता.
लवकरच सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक होणार आहे, ही जागा काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादी कडे होती, त्यामुळे या जागेवर भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांच्या समोर माने यांचे आव्हान उभा करण्याचे मनसुबे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रचले आहेत. महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेवर संधी मिळवण्यासाठी दिलीप माने प्रयत्नशील असल्याचं बोललं जातं. दिलीप माने यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठीही वाढवल्या आहेत.
गुरुवारी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी सोलापूर मध्ये दिलीप माने यांच्या घरी भेट देऊन राजकीय चर्चा केली. त्यामुळे लवकरच माने हे हातावर घड्याळ बांधतील असे मानले जात आहे.