निष्ठेला न्याय मिळणार की प्रतिक्षाच करावी लागणार
टीम : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे शिलेदार, खा शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे माजी आमदार राजन पाटील हे मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच खा. शरद पवार यांच्या जिल्ह्यातील दौऱ्यात त्यांची अनुपस्थित सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून सोलापूर जिल्ह्यात जी चार दोन नावे आहेत, त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे नाव सर्वात वर असते. गेल्या वर्षी जिल्ह्यातील अनेकांनी राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजन पाटील यांनीही भाजपात यावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मात्र पाटील पक्षासोबत ठाम राहिले एवढेच नाही तर 15 दिवसांत नवख्या यशवंत माने यांना आमदारही केले.
2009 साली मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर राजन पाटील यांना हक्काच्या मतदारसंघातुन विस्थापित व्हावे लागले. तरीही त्यांनी पक्ष निष्ठा कायम राखून कोणतीही अपेक्षा न ठेवता 2009, 2014 आणि 2019 साली पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणला. या बदल्यात गेल्या 11 वर्षात त्यांना पक्षाकडून ठोस काहीही मिळाले नाही. आणि त्यांनीसुद्धा अपेक्षा ठेवली नाही. प्रत्येक वेळी राजन पाटील यांचे विधानपरिषदेसाठी चर्चेत येते मात्र त्यांना डावलण्यात येत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद देऊन त्यांची बोळवण केली गेली. त्यानंतर ही पाटील यांनी कसलीही नाराजी व्यक्त केली नाही, प्रामाणिकपणे पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणला, मोहोळ नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला. एवढे करूनही पक्षाकडून न मागता त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही असे पाटील समर्थकांचे मत आहे.
राजन पाटील हे निष्ठावंत असले तरी स्वाभिमानी आहेत त्यामुळे पक्षाकडे काही मागणार नाहीत, पक्षानेच त्यांचा योग्य तो सन्मान राखावा अशीही अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. गेल्या 6 महिन्यात खा. शरद पवार सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आल्यानंतर राजन पाटील किंवा त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील कुठेही दिसले नाहीत.
विधानसभा निवडणुकीत ज्यांनी बंडखोऱ्या केल्या, पक्षात राहून ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यांना पक्षात मान – सन्मान, पदे मिळत आहेत मात्र निष्ठेने, निरपेक्षपणे काम करूनही राजन पाटील यांना डावलण्यात येत आहे, उलटपक्षी राजन पाटील यांच्या विरोधात कागाळ्या करणाऱ्यांना सोबत घेतले जात आहे. अशी नाराजी पाटील समर्थक व्यक्त करीत आहेत. पाटील कुटुंबांच्या या अनुपस्थितीची चर्चा मात्र जिल्ह्यात रंगली आहे. पक्ष पातळीवर पाटलांच्या निष्ठेची दखल घेतली जाणार की नाही याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.