पंढरपूरचे राजू खरे ठरू शकतात निर्णायक
आ.यशवंत माने माजी आ.रमेश कदम राजू खरे ( शिवसेना नेते )
पंढरपूर : विशेष प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. रमेश कदम यांची जामिनावर तब्बल ८ वर्षानंतर सुटका झालेली आहे. आ. कदम यांच्या सुटकेनंतर मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघातील राजकीय गणितांची फेरमांडणी होण्याची शक्यता आहे. आ. कदम यांची आणि त्यांनी केलेल्या कामाची आजही मतदारसंघात क्रेझ आहे.रमेश कदम यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यास विद्यमान आमदार यशवंत माने यांचे टेन्शन वाढणार आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असून २०१४ साली या मतदार संघातून रमेश कदम याना राष्ट्रवादीने उमेदवारी आणि कदम १५ दिवसात आमदार झाले. मात्र त्यानंतर आ. कदम यांनी कामाचा आणि लोक संपर्काचा जो धडाका लावला त्याची आजही चर्चा होते आहे. २०१५ च्या दुष्काळात कदम यांनी सिनेमास्टाईल काम करताना मागेल त्याला बोअर, मागेल त्याला रस्ता अशी कामे करण्याची वेगवान सुरुवात केली. मोहोळ तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातही हा प्रकार त्यावेळी नवीनच होता. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदार संघातील त्यांची क्रेझ वाढली. मोहोळ सह पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट १७ गावतही चांगला संपर्क ठेवला, लोकांच्या अडचणीला धावून जाण्याच्या त्यांच्या कार्य पद्धतीमुळे कदम यांची क्रेझ निर्माण झाली. परंतु विविध गुन्हयात २०१६ साली ते जेलमध्ये गेले. त्यानंतर २०१९ साली राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली, तुरुंगात असूनही अपक्ष निवडणूक लढवलेल्या कदम यांनी २३ हजार ६०० मते मिळवली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते राजू खरे यांनीही आपली शिवसेनेची उमेदवारी निश्चित समजून निवडणुकीची तयारी केलेली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये उमेदवारीसाठी यशवंत माने यांच्यासमोर राजू खरे यांचेही आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत आ. रमेश कदम यांनी पुढील वर्षभरात मोर्चे बांधणी केली आणि त्यांना महाविकास आघाडीची साथ मिळाली तर आ. यशवंत माने यांच्यापुढे मोठे आव्हान उभा राहणार आहे.
रविवारी आ. कदम यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मोहोळ मतदारसंघात त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. यावरून मतदारसंघात आजही त्यांचा करिष्मा टिकून असल्याचे दिसून आले आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीत झालेल्या राजकीय बंडामध्ये आ. यशवंत माने यांनी अजित पवार गटाची साथ दिल्याने शरद पवार समर्थक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही माने यांच्याविषयी नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसते आहे. महाविकास आघाडी एकसंघ झाल्यास २०२४ च्या निवडणुकीत मोहोळमध्ये काहीही होऊ शकते असे मानले जात आहे. या. रमेश कदम यांनी जर शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास आ. यशवंत माने यांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील १७ गावात समस्यांमुळे सामान्य नागरिकांत नाराजी
आ. यशवंत माने यांचा पंढरपूर तालुक्यातील १७ गावांत चांगला जनसंपर्क असला तरी लोकांच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. पिण्याचे स्वच्छ पाणी आणि विशेषतः रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पंढरपूर तालुक्याच्या १७ गावात आ. माने यांच्याविषयी सामान्य नागरिकांत फारशा समाधानकारक प्रतिक्रिया नाहीत. अशा वेळी माजी आ. रमेश कदम आणि पंढरपूर तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून राजू खरे यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.