माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले निवडणुकीतील भाजपच्या यशाचे रहस्य
पंढरपूर : eagle eye news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेला विकास, केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे, बुथच्या पन्ना प्रमुखपासून ते लोकसभा क्लस्टर पर्यंतचे संघटनात्मक नियोजन याच्या जोरावर भाजपने निवडणुकीत यश मिळवले आहे. त्याच संघटनात्मक बळावर भाजप निवडणुकीला सामोरे जात असून माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप जिंकनार, असा विश्वास भाजपचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे परिचारक हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक विनायक हरिदास उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, माढा मध्ये मोहिते पाटील हे इच्छुक होते हे खरे आहे, आज ते जरी मतदारसंघात फिरत असेल तरी कुणीही वेगळी भाषा केलेली नाही. त्यामुळे येत्या काळात सगळे मिळून एकत्र निवडणुकीला सामोरे जातील, माढा लोकसभे बाबत कोणत्याही प्रकारचा वेगळा विचार होणार नाही.
भाजपच्या संघटनात्मक बांधणी विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,
भाजपा पक्ष संघटनेच्या बळावर कोणतीही निवडणूक लढत असतो. भाजपचे संघटन हे प्रत्येक बूथ रचनेपासून ते लोकसभा क्लस्टर पर्यंत विविध पातळ्यावर काम करीत असते. क्लस्टर मधील प्रत्येक विधानसभा मतदार संघात ७०० कार्यकर्ते काम करीत असतात. सहा टप्प्यात प्रत्येक मतदारसंघाचे नियोजन झालेले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांचे १८ ते २० हजार लभार्थी असतात, त्या प्रत्येक लाभार्थींपर्यंत भाजपचा कार्यकर्ता पोहोचत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचविली आहे. प्रत्येक बुथवर भाजपला ५१ टक्के मतदान झाले पाहिजे असे बूथवार नियोजन झालेले आहे. मागील तीन महिन्यात हे काम झालेले आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच या दोन लोकसभा मतदारसंघात दिसणार आहे .
माढा मतदार संघातील उमेदवारीबाबत जी नाराजी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दूर होईल व पक्षातील सर्व नेते पदाधिकारी मिळून काम करून माढा व सोलापूर लोकसभेची जागा नक्कीच जिंकून देतील. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ सोडला तर सर्व विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष व युतीचे आमदार असल्यामुळे या मतदारसंघात वेगळे काही होईल असे वाटत नाही, असाही विश्वास प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.