ना.जयंत पाटील आणि अनिल देशमुखांच्या भेटीनं चर्चांना उधाण
टीम : ईगल आय मीडिया
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली असून, मोहितेंच्या पक्ष प्रवेशावर जोरदार खलबतं सुरू आहेत. त्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठीच मोहितेंना प्रवेश देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आ.विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला होता.त्यानंतर काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले.
अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुबोध मोहिते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री राहिले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते भाजपचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. 1998 मध्ये त्यांना शिवसेनेनं रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव केला. 1999 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी श्रीकांत जिचकार यांना पराभवाची धूळ चारली.
शिवसेना खासदार म्हणून केंद्रात मंत्री झालेल्या मोहिते यांनी नारायण राणेंच्या पाठोपाठ पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख असताना काँग्रेसनं त्यांना उपाध्यक्षपद आणि प्रवक्तेपद दिले. काँग्रेसनंसुद्धा त्यांना रामटेकमधून दोनदा उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर काँग्रेसशी फारकत घेत त्यांनी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. मोहिते यांनी शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवर नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केली आहे.