शेट्टी-खडसेंच्या आमदारकीत खोडा !

नियुक्ती विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका : आज सुनावणी शक्य

टीम : ईगल आय मीडिया

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर निवडून जाण्याच्या माजी खा राजू शेट्टी, एकनाथ खडसे, सचिन सावंत, यशपाल भिंगे आदींसह 8 जणांच्या नियुक्ती ला हरकत घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली असून आज याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिलीपराव आवाळे व शिवाजी पाटील यांनी ज्येष्ठ वकील ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याप्रश्नी दोन जनहित याचिका केलेल्या आहेत.

विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती साठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 नावांची शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यापैकी आठ जण हे निव्वळ राजकीय पार्श्वभूमीचे आहेत. कला, साहित्य, विज्ञान, सहकार चळवळ किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख व योगदान नाही. केवळ राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्या नावांची शिफारस केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या करण्यास राज्यपालांना मज्जाव करावा’, अशी विनंती बुधवारी तातडीच्या अर्जांद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली. त्यामुळे याप्रश्नी आज, गुरुवारी न्या. संभाजी शिंदे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना शिफारस केलेल्यांमध्ये एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस), राजू शेट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस), यशपाल भिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस), आनंद शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), रजनी पाटील (काँग्रेस), सचिन सावंत (काँग्रेस), सय्यद मुझप्फर हुसैन (काँग्रेस), अनिरुद्ध वनकर (काँग्रेस), उर्मिला मातोंडकर (शिवसेना), चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना), विजय करंजकर (शिवसेना) व नितीन पाटील (शिवसेना) यांचा समावेश असल्याचे कळले आहे. यापैकी उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, नितीन पाटील व अनिरुद्ध वनकर हे कला क्षेत्राशी निगडित आहेत.

राज्यघटनेच्या अनुच्छेद १७१(५) अन्वये कला, साहित्य, सामाजिक कार्य, विज्ञान व सहकार चळवळ या क्षेत्रांना या १२ पदांवर प्रतिनिधित्व मिळणे अभिप्रेत आहे. इतर आठ जणांची नावे या क्षेत्रांशी निगडित नसून त्यांची या क्षेत्रात भरीव योगदान देणारे तज्ज्ञ म्हणून ओळख नाही. काहींनी यापूर्वी निवडणूक लढवून विधानसभा किंवा विधान परिषदेवर प्रतिनिधित्व केले आहे किंवा काही जण निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. काहींच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणे नोंद आहेत. त्याचीही छाननी झालेली दिसत नाही.

केवळ राजकीय वरदस्त असल्याने राजकीय पुनर्वसन होण्यासाठी त्यांच्या नियक्त्या करण्यात येणार आहेत. परिणामी पुन्हा एकदा घटनात्मक तरतूद असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदार पदांवर राजकीय नियुक्त्याच होण्याची भीती आहे. त्यामुळे खडसे, शेट्टी यांच्यासह इतर आठ जणांना या पदांसाठी पात्र मानू नये, अन्यथा घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन होईल, असे आम्ही राज्यपालांनाही सविस्तर लेखी पत्राद्वारे निदर्शनास आणले आहे. या आठ जणांच्या नियुक्त्या करण्यास राज्यपालांना मज्जाव करावा’, अशी विनंती याचिकादारांनी अर्जांमध्ये केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!