‘ मित्रांच्या मदती’ साठी आ. भालकेंचा पुढाकार ?
पंढरपूर : ईगल आय मीडिया
अडचणीच्या काळात पक्षाला सोडून गेलेल्या माजी खा. धनंजय महाडिक यांच्यासह ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कल्याणराव काळे यांच्याविषयी असलेली ‘ व्यक्तिगत ‘ नाराजी बाजूला सारून हजारो शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्थांचे ‘ हित ‘ लक्षात घेऊन राज्य सरकार भीमा आणि सहकार शिरोमणी या दोन्ही सहकारी साखर कारखान्यास मदत करण्यास राजी झाल्याची माहिती मिळते आहे.
मात्र या कामी आम. भारत भालके यांची शिष्टाई बऱ्याच प्रमाणात कामी आल्याचेही बोलले जाते. दोन्ही मित्रांसाठी आ. भालके 2 दिवस मुंबईत ठिय्या मारून होते. अजितदादा आणि राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आ. भालके यांनी ‘ एवढं करावं लागतंय ‘ असा हट्ट धरल्याने शेवटी ‘ संस्थेच्या हितासाठी ‘ अजित पवार राजी झाल्याचे समजते. त्यामुळे उशिरा का होईना भीमा आणि सहकार शिरोमणी या दोन्ही साखर कारखान्यास शासकीय नियमात बसवून आर्थिक मदत मिळण्याची आशा बळावली आहे.
यंदाचा ऊस गाळप हंगाम आता सुरू होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. मात्र धनंजय महाडिक चेअरमन असलेल्या भीमा आणि कल्याणराव काळे चेअरमन असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास मात्र राज्य सरकारने मदत देण्यास टाळाटाळ केली होती. नियम, निकष असली करणे पुढे केली तरी यामागे राजकारण होते हे सर्वज्ञात आहे.
धनंजय महाडिक यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता तर कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांविषयी अजित पवार यांची मर्जी खप्पा झालेली आहे. त्यामुळेच या दोन्ही साखर कारखान्यास राज्य सरकारची मदत मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता.
महाडिक आणि कल्याणराव काळे यांनी यासाठी गेल्या महिनाभर जोरदार पाठपुरावा केला. काळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अनेकवेळा खेटे घातले. खा. पवारांच्या पंढरपूर दौऱ्यात काळे यांनी त्यांचा पिच्छा पुरवत थोरल्या पवारांची मर्जी संपादन केली. मात्र धाकट्या पवारांची नाराजी दूर करण्यासाठी अखेरीस आ. भालके मदतीला आल्याचे दिसून येते.
बुधवारी आम. भालके यांनी जयंत पाटील यांच्याकडे ” मदत करावी लागतेय ” असा हट्ट धरला तर गुरुवारी अजित पावर यांच्याकडे भालके, महाडिक, काळे जाऊन भेटले आणि शक्य त्या मदतीचा सिग्नल घेऊन परतले आहेत. या दोन्ही साखर कारखान्यास जेवढी मागणी आहे तेवढी रक्कम मंजूर होणार की ‘ नियम, निकषात ‘ बसवून बोळवण होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी भीमा आणि सहकार शिरोमणी या दोन्ही संस्थांच्या हितासाठी म्हणून व्यक्तिगत नाराजी बाजूला सारून मदत करण्यास अर्थमंत्री अजित पवार राजी झाल्याचे समजते.