पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा प्रचार जोमात !

नियोजनाचा अभाव आणि तिन्ही पक्षातील विसंवाद यामुळे महाविकास आघाडी कोमात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षाने नेटके नियोजन करून प्रचारात आघाडी घेतली आहे तर विरोधी काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेने च्या गोटात मात्र नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरी भाजप आघाडी जोमात आणि महाविकास आघाडी कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीला आता जेमतेम 10 दिवस उरलेले आहेत. 5 जिल्ह्याचे क्षेत्र असलेल्या या विस्तीर्ण मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात पोहोचणे उमेदवारांना अशक्य आहे, त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी, सहकारी पक्ष यांच्या जोरावरच आता उमेदवारांना निवडणूक लढवावी लागत आहे.

या मतदारसंघात भाजपा पक्ष म्हणून महाविकास आघाडीसमोर एकाकी वाटत असला तरी तगडे नियोजन, भाजपमध्ये नव्याने आलेल्या नेत्यांचे स्थानिक पातळीवरील नेटके नियोजन, संघटन लक्षात घेता भाजपला सध्या तरी पोषक वातावरण दिसत आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच शिवसेना यांच्यात ताळमेळ दिसत नाही. एवढंच नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्येही पुन्हा गटबाजी आणि नेत्यांमधील विसंवाद, वरून आदेश येण्याची प्रतीक्षा, उमेदवाराच्या यंत्रणेकडे आणि ‘ नियोजनाकडे’ नजरा लावून सक्रिय होण्यासाठी चालू असलेला वेळ काढुपणा अडचनीच ठरणार आहे.

नेहमी प्रमाणे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकरी बाजूला पडले आहेत आणि उमेदवारांचा थेट संपर्क किंवा नियोजनाची जबाबदारी नेत्याकडे असल्याची दिसते.त्यामुळेच कार्यकर्ते, पदाधिकारी अजूनही अंग झाडून कामाला लागल्याचे दिसत नाहीत. पदवीधर हा सुशिक्षित मतदार असतो, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे किंवा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता नसली तरी उमेदवार, त्याचे पदविधरांसाठी धोरण, कृती कार्यक्रम तरी मतदारांपर्यत पोहोचणे आवश्यक असते, मात्र अद्याप उमेदवारांचे परिचय पत्रक सुद्धा मतदारांपर्यत पोहोचलेले नाहीत.

पदविधरांच्या उमेदवारांची ही अवस्था आहे तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अद्याप जिल्ह्यात आल्याचेही दिसून येत नाहीत. या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन तगडे उमेदवार आहेत, त्यातही अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचा जिल्ह्यातील शिक्षकांवर मोठा प्रभाव असताना काँग्रेसचे उमेदवार मात्र अद्याप शिक्षकांना माहीत सुद्धा झालेले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचा ताळमेळ बसलेला नाही, तो बसावा यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत.

आज घडीला सेनेचा पदवीधर मतदार भाजपकडे झुकल्याचे दिसते तर काँग्रेस, राष्ट्रवादी चे समर्थक मतदार निवडणुकीत असलेल्या विस्कळितपणामुळे संभ्रमात आहे. जिल्ह्यातील निवडणूक परिस्थिती दररोज बदलत असून भाजपने ती आपल्यासाठी अनुकूल करण्याचा नेटाने प्रयत्न सुरू केला आहे, तर विरोधी आघाडीत नियोजनाचा अभाव आणि चालढकल सुरू असल्याचे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!