आ.प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे,भगीरथ भालके, वसंतराव देशमुख, संभाजी शिंदे, दिलीप घाडगे, ऍड.गणेश पाटील, शैला गोडसे, रजनीताई देशमुख यांच्या गावातील लढतीकडे लक्ष
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून यानिमित्ताने तालुक्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. आ. प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, वसंतराव देशमुख, संभाजी शिंदे, दिलीप घाडगे, ऍड.गणेश पाटील, रजनीताई देशमुख आदीच्या ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होतात की कशा प्रकारे रंगतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील 94 पैकी 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असल्याने संपूर्ण तालुका निवडणूकमय झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ही वाड्या, वस्त्यावरील प्रश्न आणि भाऊ -बंधकी च्या पातळीवर लढवली जाते. इथे राजकीय पक्ष, नेते, तालुक्यातील गट – तट हे विषय गौण ठरतात. तरीही तालुक्याचे कारभारी असलेल्या बड्या नेत्यांच्या गावात काय होतंय याकडे इतर गावच्या जनतेचे, कार्यकर्त्या चे, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले असते.
पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीमध्ये आ. प्रशांत परिचारक यांची खर्डी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या वाडी कुरोली, विठ्ठल सहकारी चे चेअरमन भगीरथ भालके यांच्या सरकोली, पांडुरंग सहकारी चे उपाध्यक्ष आणि जेष्ठ नेते वसंतराव देशमुख यांच्या कासेगाव, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या भाळवणी, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्या सुस्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.गणेश पाटील यांच्या भोसे, पांडुरंगचे माजी चेअरमन दिनकर मोरे यांच्या चळे, जि प सदस्या रजनी देशमुख यांच्या करकम्ब, जि प सदस्या शैला गोडसे यांच्या आंबेचिंचोली, सौ सविता गोसावी यांच्या वाखरी या प्रमुख गावांतील लढती कशा होतात, यातील किती बिनविरोध होतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
दीपक पवार : जैनवाडी बिनविरोध केली हरीश गायकवाड : चळे मध्ये काय होणार ? जि प सदस्या रजनीताई देशमुख
राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांनी आपल्या जैनवाडी ग्रामपंचायत ची निवडणूक बिनविरोध करून प्रमुख नेत्यांच्या या शर्यतीत बाजी मारली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आजवर केवळ 17 ग्रामपंचायत साठी 88 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही या बड्या नेत्यांच्या गावातून फारसे अर्ज आलेले नाहीत. गाव पातळीवर उमेदवार निवडी, आघाड्या तयार करणे, कागदपत्रे गोळा करणे अशी लगबग सुरू असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ही अनेक गावांत चर्चा सुरू आहेत.
आजवर वाडी कुरोली, भाळवणी वगळता अन्य नेत्यांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचा इतिहास नाही. मात्र यावेळी तालुक्यातील कोरोना परिस्थिती, त्यामुळे मोठ्या राजकीय नेत्यांना गमावण्यामुळे तालुक्यावर असलेले दुःखाचे सावट लक्षात घेता निवडणूका लढवताना पारंपरिक उत्साह, जोश फारसा दिसून येत नाही.
मात्र खर्डी, कासेगाव, सरकोली, वाडी कुरोली,भाळवणी, सुस्ते, करकम्ब, भोसे, चळे आदी प्रमुख नेत्यांच्या गावात काय होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 30 डिसेंम्बर अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत निवडणूक बिनविरोधासाठी प्रयत्न केले जातील असे दिसते.