जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी खंत व्यक्त केली.
टीम : ईगल आय मीडिया
मागील काही वर्षांपासून काँग्रेस मध्ये दुर्लक्षित असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षात होत असलेली घुसमट आज इंदापूर येथे बोलून दाखवली. काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे असल्याचा खळबळजनक दावा करतानाच शिंदे यांनी एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंतही व्यक्त केली. आज ( मंगळवारी ) इंदापूर येथे काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, 1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, अशी साशंकताही त्यांनी बोलून दाखविली. यावेळी सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
त्यांच्या आमदार कन्या प्राणिती शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल असे वाटत असताना त्यांनाही डावलण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आल्यानंतर मागे पडल्याचे बोलले जाते.या एकूणच घडामोडी मुळे पक्षात माझ्या शब्दाला किंमत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केल्याचे मानले जाते.
गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस मध्ये जेष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात आहे..त्याच प्रमाणे एकेकाळी सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय, काँग्रेसचे लोकसभेतील पक्षनेते राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेच्या दोन निवडणुकांत पराभव होताच पक्षात डावलण्यात येत आहे. एवढेच नाही तर सध्या काँग्रेस पक्षात त्यांना कसलीही जबाबदारी दिलेली नाही. कार्यकारिणीत सुद्धा शिंदे यांना स्थान दिलेले नाही. असे असूनही शिंदे वर्षभरापासून गप्प आहेत. मात्र आज रत्नाकर महाजन यांच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिल्याचे मानले जाते.