करकम्ब च्या निवडणूकीत नाती आली गोत्यात !

आजोबा, सून आणि नातू, नणंद,भावजय, जावा-जावा आणि काका पुतणे परस्परविरोधी निवडणुक रिंगणात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील करकंब ग्रामपंचायत निवडणुकीत परंपरेनुसार देशामुखीचा जोर असून एकाच कुटुंबातील आजोबा, सून आणि नातू असे तीन पिढ्यांचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भावा – भावात, काका – पुतणे आणि नणंद -जावात ही झिंगाट जुंपलं आहे. देशमुखीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभा करण्याची घोषणा हवेतच विरली असून पुन्हा एकदा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत ची निवडणूक देशमुख केंद्रीत झाली आहे.
विशेष म्हणजे दोन्हीही देशमूख बंधुंनी आपापल्या घरातील तीन-तीन उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविले आहेत.

गावच्या १७ जागांसाठी ४३ जणांमध्ये लढत होत आहे. विशेष म्हणजे मोठा गाजावाजा करत गाठीभेटींवर जोर दिलेल्या तिसऱ्या आघाडीने आपले सर्व अर्ज काढून घेतले असून काही ठिकाणी अपक्षांनी डोके वर काढले आहे. मारुती देशमूख आणि नरसाप्पा देशमूख या सख्ख्या भावांच्या दोन प्रमूख गटात ही निवडणुक होत आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण साठी निघण्याची शक्यता गृहित धरुन या दोन्ही बंधुंनी आपापल्या घरातील महिलांना निवडणुक रिंगणात उतरविले आहे.

जेष्ठ नेते माजी सरपंच मारुती देशमूख हे स्वतः, त्यांच्या सूनबाई बबिता देशमूख आणि नातू महेश देशमूख असे एकाच घरातील तीन पिढ्यांचे तीन उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. तर त्यांचे विरोधी गटाचे प्रमुख नरसाप्पा देशमूख गटातून त्यांचे पूत्र विद्यमान सरपंच आदिनाथ देशमूख आणि दोन सुना वैशाली देशमूख व कल्पना देशमूख असे तिघेजण निवडणूक लढवित आहेत.

काका पुतणे निवडणूक मैदानात !
प्रभाग एक मध्ये विद्यमान पंचायत समिती सदस्य राहूल पूरवत आणि अभिषेक पूरवत ह्या काका-पुतण्यामध्ये लढत होत आहे. येथेही सरपंचपदाचे आरक्षण इतर मागासवर्ग पुरुष गटासाठी निघाले तर सरपंचपदाची हीच सुर्णसंधी असल्याचा विचार करुन राहूल पूरवत यांनी कंबर कसली आहे.

नाती आली गोत्यात !

विद्यमान सरपंच आदिनाथ देशमूख आणि माजी जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब देशमूख यांचे पूत्र महेश देशमूख ह्या काका-पुतण्यामध्ये प्रभाग दोन मध्ये लढत होत आहे. प्रभाग चार मधून मारुती देशमूख यांची सून बबिता देशमूख आणि नरसाप्पा देशमूख यांची सून कल्पना देशमूख ह्या चूलत जावांमध्ये लढत होत आहे.
तर प्रभाग तीनमधून तृप्ती पांढरे (देवकते)- तेजमाला पांढरे ह्या नणंद भावजयां समोरा-समोर उभ्या आहेत.
बापूराव शिंदे- महेंद्र शिंदे, रेखा गायकवाड- सीमा गायकवाड, लुमावती खारे- बाळूबाई खारे, सतिष माने- तुकाराम माने, दिलीप व्यवहारे- महादेव व्यवहारे व मनिषा शिंगटे- ज्योती शिंगटे ह्या जवळच्या भावकीतील लढती लक्षवेधक ठरणार आहेत. एकंदरीतच करकंब ग्रामपंचायतीचे निवणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता नात्या-नात्यामधील आणि भाव-भावकीतील लढतीमुळे चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!