बबनराव अवताडे यांच्या कार्यालयात पालकमंत्र्यांचा सन्मान
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा तालुक्यातील जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून पालकमंत्री दत्तमामा भरणे यांचा सत्कार केला. यावेळी आमदार भारत भालके यांचीही लक्षवेधी उपस्थिती होती. सहा ते आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबनराव अवताडे यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे केलेले स्वागत तालुक्यात राजकीय खळबळ उडवून देणारे आहे.
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि दामाजी सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक बबनराव अवताडे हे दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांचे चुलते आहेत. समाधान अवताडे यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते घेऊन निवडणुकीत थरार निर्माण केला होता.
मागील 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था, दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत समाधान अवताडे यांनी आमदार भारत भालके यांना जेरीस आणले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यात समाधान अवताडे यांनी पहिल्या क्रमांकाची मते घेऊन आ. भालके यांना दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. या निवडणुकीत समाधान अवताडे यांना बबनराव अवताडे यांची मोठी मदत झाली होती.
बबनराव आणि समाधान या अवताडे चुलते पुतण्यामध्ये दामाजी च्या अध्यक्ष पदावरून अधूनमधून धुसफूस चालत असते.
या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री दत्तमामा भरणे हे मंगळवेढा तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीस आले असता बबनराव अवताडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी अवताडे यांचा सत्कार स्वीकारला. यावेळी आमदार भारत भालके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे उपस्थित होते.
दामाजी सहकारी ची निवडणूक जवळ आलेली असताना बबनराव अवताडे यांनी राष्ट्रवादी च्या पालकमंत्र्यांना बोलावून केलेला सत्कार तालुक्यात राजकीय खळबळ उडवणारा आहे.