धाडसाला सत्तेची साथ : तिसऱ्या टर्मची वर्षपूर्ती

आम.भारत भालके यांच्या हॅटट्रिक वर्षपूर्तीचा आढावा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्या वेळी निवडून येत आ. भारत भालके यांनी हॅटट्रिक केली आहे. तिसऱ्या टर्मच्या पहिल्या वर्षाची आज पूर्तता झाली आहे. ध्यानी – मनी नसताना आ. भालकेंच्या धाडसाला सत्तेची साथ आहे लाभली आहे. त्यामुळेच एक वर्ष पूर्ण होत असताना भालके यांनी अडचणीत असलेला साखर कारखाना सुरू केला तशीच फडणवीस सरकारने गुंडाळून टाकलेली 35 गावची उपसा सिंचन योजना मार्गी लावली. त्याचबरोबर मतदारसंघातील इतरही कामांना गती देण्यात भालके यांना यश मिळाले आहे.

आ. भालके यांच्या विधानसभेच्या तिन्ही निवडणुका वैशिष्ट्य पूर्ण ठरल्या आहेत. ‘नशीब शुराला साथ देते’ असे म्हटले जाते. आ.भालके यांच्या तिन्ही वेळच्या निवडणुका धाडसी होत्या. त्यांच्या राजकीय आणि संस्थेच्या अस्तित्वावर परिणाम करणाऱ्या होत्या,मात्र तरीही भालके यांनी धाडस केले आणि तीनही निवडणुका जिंकल्या आहेत. 2009 साली पहिल्या निवडणुकीत चमत्कार घडवत त्यावेळी विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या सारख्या बलाढ्य नेत्याला रिडलोस नावाच्या नाममात्र आघाडीकडून हरवले. काँग्रेस आघाडी सरकार ला पाठिंबा देऊन 5 वर्षात अनेक महत्वाची कामे मार्गी लावली. त्याच कामाच्या जोरावर 2014 साली एकहाती निवडणूक लढवली. काँग्रेस विरोधी प्रचंड मोठी लाट असताना काँग्रेसचीच उमेदवारी घेतली आणि पंढरपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होऊनही भालके यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.

राज्यात भाजपचे सरकार आल्याने या पाच वर्षात त्यांना कायमच संघर्ष करावा लागला. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुद्धा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला. मागील वर्षी विधानसभेच्या तोंडावर भालके भाजपमध्ये जातात की शिवसेनेत अशी चर्चा असताना अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधावे लागले. तोवर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 -25 तरी आमदार येतात की नाही अशी परिस्थिती होती. मात्र आम. भालके यांच्या मदतीला खा. शरद पवार यांची लाट आली आणि भालके यांनी हॅटट्रिक केली.

हॅटट्रिक केली तरीही आम. भालके आणि त्यांचे समर्थक चिंतेत होते कारण राज्यात सत्ता पुन्हा भाजप- शिवसेनेची आली होती. पुन्हा 5 वर्षे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागणार आणि संस्थेच्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा असा भला मोठा प्रश्न समोर होता. मतदारसंघातील प्रश्न प्रलंबित होते, ते कसे सोडवायचे हा ही प्रश्न होता. मात्र 2019 साल सरता – सरता राज्यात पुन्हा एक राजकीय चमत्कार झाला आणि आ.भालके सत्ताधारी पक्षाचे, सर्वोच्च नेत्याच्या खास मर्जितले आमदार झाले.

हॅटट्रिक ची निवडणूकित भालके यांनी प्रतिकूल परिस्थिती असतानाही राष्ट्रवादीची निवड केली आणि निवडूनही आले, तसेच हा पक्ष सत्तेत ही आला. त्यामुळे गेल्या 10 महिन्यात सत्ताधारी पक्षाचा, नेत्यांच्या खास वर्तुळातला आमदार म्हणून आम. भारत भालके मिरवू लागले आहेत.

याच सत्तेच्या सर्कलमध असल्याने विठ्ठल सहकारीचे आर्थिक अरिष्ट दूर होऊन कारखाना विजया दशमीच्या मुहूर्तावर 10.10 वाजता गाळप हंगाम सुरू करतो आहे. 35 गावच्या उपसा सिंचन योजनेला जशीच्या तशी या स्वरूपात मंजुरी घेऊन टोकन निधीही मिळवला आहे. शिरणांदगी हा दुष्काळी भागातील तलाव यंदा प्रथमच उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतला आहे. विरोधी गट आपल्याच अस्तित्वात गुरफटलेले असताना आम. भारत भालके यांचा वारू मात्र मोठ्या दिमाखाने दौडत आहे.

शुराला नशीब साथ देते असे म्हटले जाते तसे दरवेळी धाडस करणाऱ्या आम.भालके यांना यावेळी ही भरभक्कम साथ दिली आहे. येत्या काळात या सरकारच्या मदतीने मतदारसंघातील विकास कामे मार्गी लागतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!