तुमच्या इतका दळभद्री पालकमंत्री जिल्ह्याने अनुभवला नव्हता !

 माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर आ. भारत भालके भडकले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

25 वर्षापेक्षा अधिक वर्षे राज्याच्या राजकारणात अनेक खात्यांचा कारभार तत्परतेने पाहत त्या खात्याला राज्यात प्रथम क्रमांकावर आणून कामाचा प्रचंड उरक असणारे, कणखर नेतृत्व म्हणून प्रशासनामध्ये देखील दबदबा निर्माण करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाबाबत मोजमाप करण्याच्या आसपास सुद्धा तुम्ही पोहोचत नाही, असे सांगत त्यांच्या इतका पुळचट व दळभद्री पालकमंत्री जिल्ह्याने अनुभवला नव्हता अशी खरमरीत टिका केली आहे प्रसिद्धीपत्रकात आ. भारत भालके यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंढरपूर सह सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अजित पवार यांच्यावर नामधारी असल्याची टीका केली होती, त्याला आ भारत भालके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.

देशमुख यांच्या निष्क्रियते बद्दल सांगत असताना भालके यांनी विजयकुमार देशमुख यांच्या ‘कर्तबगरीचा’ पाढाच वाचला आहे. 2015 च्या दुष्काळात अधिवेशन काळात 394 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागणी मी स्वता: व गणपतराव देशमुख यांनी लावून धरली असता, तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फक्त 52 कोटी रुपये देऊन जिल्ह्याची बोळवण केली होती. देशमुखांच्या कार्यकाळात ते देखील पैसे  माघारी गेले.   पाच वर्षाच्या कार्यकाळात कोणत्यही पीक विमा कंपनीला आपण शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील विमा दिला नाही, याबद्दल जाब विचारू शकला नाही. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या निष्क्रियतेचा फटका बसला शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी तुमच्या नामधारी पालकमंत्री पदाला दिली पाहिजे का? असा सवाल आ. भालके यांनी केला आहे.

आद्य सुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढ्यातील राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्षपदी काम करत असताना पाच वर्षात केवळ घोषणे शिवाय नामधारी का राहिला. संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत मी स्वता:  सभागृहात आवाज उठवल्यानंतर शासनाकडून स्मारकाबाबत घोषणा झाली. परंतु पालकमंत्री म्हणून आपण निधी मिळवण्याबाबत आपली उदासीनता बघायला मिळाली. मंगळवेढ्यातील कृष्ण तलाव सुशोभीकरण करून देणार असे तलाव पाहणी करण्यास आल्यानंतर मंगळवेढेकरांना शब्द दिला होता, तो शब्ददेखील नामधारी होता का असा सवाल करून , राईनपाडा हत्याकांडात दुर्दैवी बळी गेलेल्या कुटुंबीयांना शासकीय नोकरीत सामावून घेणे व घरे देण्याची मागणी आम्ही केली होती. ती देण्यास मी कटिबद्ध आहे असे तालुक्यातील खवे या गावात येऊन सांगून गेल्यानंतर त्यांना शासकीय नोकरी मिळाली नाही व घरे ही मिळाले नाहीत. परिवहन खात्याचा कारभार पाहत असताना सोलापूर शहरातील बसस्थानक अद्ययावत करू शकला नाही याला निष्क्रियतेचा कळस म्हणणे सोयीचे ठरेल.

सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन योजना आपणाला पूर्णत्वास नेता आली नाही, नरसिंग गिरजी मिलच्या जागेत गारमेंट पार्क उभा करण्याची घोषणा आपण वस्त्रोद्योग खात्याचा कारभार पाहत असताना केली अशी विचारणा करून भालके यांनी, आपण सांभाळलेल्या मंत्रिपदाच्या काळात विविध खात्याला न्याय दिला असता तर राज्याला फायदा झाला असता शहरातील एका चौकात बसून अनेक वर्ष घालवलेल्या महोदयानी याबाबत आत्मपरीक्षण करावे असा उपरोधिक टोला दिला आहे

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून पंढरपूर साठी 200 बेडचे हॉस्पिटल उभारण्याची घोषणा झाली होती. मात्र राजकीय सूडबुद्धीने त्या खात्याचे मंत्री असताना देखील ते होऊ दिले नाही. पंढरपूर येथे कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव बृहत आराखड्यानुसार शासनाकडे दाखल केलेला असतानादेखील इतर मंत्र्यांनी आप आपल्या जिल्ह्यात मंजूर करून घेतली, मात्र आपण त्याबद्दल काहीच करू शकला नाही.

आरोग्य खात्याचा राज्य मंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अनेक रिक्तपदे भरण्याबाबत मी पत्रव्यवहार केला, सभागृहात अनेक वेळा आवाज उठवला. पण आपल्या निष्क्रियतेने पद भरती होऊ शकली नाही अशीही टीका भालके यानी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!