शेकाप’चे एकमेव आमदार राष्ट्रवादी’त जाणार !

लोहा – कंधार मतदार संघावर पुन्हा राष्ट्रवादीचे वर्चस्व येणार

टीम : ईगल आय मीडिया

लोहा कंधार ( जि. नांदेड ) विधानसभा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर आम.शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीत आ.शिंदे हे निवडून आले आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा 63 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. आ. शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादी चे विधासभेतील बळ पुन्हा वाढणार आहे.

लोहा कंधार हा विधानसभा मतदार संघ शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघात यापूर्वी शेकाप आणि काँग्रेस अशा लढती होत होत्या.मात्र गेल्या 20 वर्षात चित्र बदलले आहे. या मतदार संघात 2009 साली राष्ट्रवादी, 2014 साली शिवसेना विजयी झाली होती.मात्र 2019 साली पुन्हा शेकाप च्या तिकिटावर शामसुंदर शिंदे 1 लाख 1 हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. विधानसभेत शेकापचे ते एकमेव सदस्य आहेत.

मात्र त्यांनी निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा दिला होता. अल्पकालीन फडणवीस सरकारला शिंदे यांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता आ.शिंदे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देतानाच थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आ. शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर शिंदे यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. पंढरपूर चे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी चे विधानसभेतील संख्याबळ 1 ने कमी झाले होते ते आता आ. शिंदे यांच्या प्रवेशाने वाढणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!